Published On : Wed, Aug 9th, 2017

मराठा आरक्षणावरून सरकार दिशाभूल करते आहे!: राधाकृष्ण विखे पाटील

Advertisement

392025-vikhe-patil
मुंबई: मागील दोन वर्षांपासून मराठा, मुस्लीम, धनगर समाजाचे राज्यभरात मोठ-मोठे मोर्चे निघत असताना सरकारकडून फक्त दिशाभूल सुरू आहे. त्याचा मोठा उद्रेक आज मुंबईच्या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून दिसून येतो, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

मुंबईत निघालेल्या मराठा मोर्चासंदर्भात पत्रकारांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, आज सभागृहात आम्ही स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा विषय उपस्थित करणार होतो. परंतु, विरोधी पक्षांना हा विषय मांडूच द्यायचा नाही, अशी भाजप-शिवसेनेची भूमिका होती. आरक्षण देण्याचे दायित्व सरकारचे आहे. परंतु, ते चर्चा करत नाहीत,निर्णयही घेत नाहीत असा आरोप करत, सरकारने अधिक विलंब न करता आजच सभागृहामध्ये एका ओळीचा ठराव आणून ताबडतोब आरक्षणाचा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.

भाजप-शिवसेना सरकार ‘फोडा आणि झोडा’ या नीतिने समाजा-समाजात दुही निर्माण करून आरक्षणाच्या मागणीला पद्धतशीर बगल देण्याचा प्रयत्न करते आहे. आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका प्रामाणिक नाही, हे वारंवार स्पष्ट झाले आहे, अशी टीका विखे पाटील यांनी केली.
यावेळी विखे पाटील यांनी शिवसेनेवरही तोफ डागली. नागपूर अधिवेशन काळात निघालेल्या मराठा महामोर्चाच्यावेळी आपले खोटे प्रेम दाखविण्यासाठी शिवसेनेचे आमदार भगवे फेटे घालून विधानसभेत आले होते. त्यावेळी मी सभागृहात विचारले होते की, तुम्ही कोणता उत्सव साजरा करण्यासाठी फेटे घालून आला आहात? आज मात्र शिवसेना आमदारांच्या डोक्यावरील फेटे गायब झाले आहेत. शिवसेनेची भूमिका दरवेळी हवामानाप्रमाणे बदलते. कर्जमाफी, मराठा आरक्षण, समृद्धी महामार्ग अशा अनेक विषयांवर त्यांची भूमिका दुटप्पीपणाची राहिली आहे, असे विखे पाटील म्हणाले.