नागपूर : नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया (शिक्षण मंत्रालय) च्यावतीने व महाराष्ट्र शासन आणि झिरो माईल यूथ फाउंडेशन यांच्या सहयोगाने आयोजित ‘नागपूर पुस्तक महोत्सव २०२५’ चे आयोजन २२ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान रेशीमबाग मैदान, नागपूर येथे होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या नऊ दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.
उद्घाटन समारंभास महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, प्रसिद्ध लेखक अमीश त्रिपाठी, एनबीटीचे संचालक युवराज मलिक, तसेच झिरो माईल यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष अजय संचेती आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नागपूर पुस्तक महोत्सव 2025 मध्ये देशभरातील ३०० हून अधिक प्रकाशक सहभागी होणार असून विविध भारतीय भाषांतील सर्व वयोगटांसाठीची पुस्तके एकाच ठिकाणी आणि तीही आकर्षक सवलतीत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हल’ – चार दिवसीय साहित्य महोत्सव-
नागपूर पुस्तक महोत्सव २०२५ अंतर्गत २३–२४ आणि २९–३० नोव्हेंबर दरम्यान ‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे.
या साहित्य महोत्सवाचे उद्घाटन २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, लेखक व शिवकथाकार विजयराव देशमुख, एनबीटीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद सुधाकर मराठे, संचालक युवराज मलिक, झिरो माईल यूथ फाउंडेशनचे मार्गदर्शक सत्यनारायण नुवाल, अध्यक्ष श्री. अजय संचेती आदी उपस्थित राहतील.
या चार दिवसीय महोत्सवात अक्षत गुप्ता, नितीन गोखले, प्रशांत पोळ, सरिता कौशिक, सुप्रसिद्ध दिग्दर्शक विपुल शाह, चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे, लेखिका शेफाली वैद्य, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, लेखक सुनील आंबेकर यासारखे प्रतिष्ठित साहित्यिक व कला क्षेत्रातील व्यक्ती सहभागी होणार आहेत.
तसेच कुमुद शर्मा, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी व दिग्पाल लांजेकर, आयजीपी संदीप पाटील, उद्योजक–लेखक अंकुर वारीकू, अॅड. विष्णु जैन, शिक्षणतज्ज्ञ आनंद कुमार, आंतरराष्ट्रीय ॲथलिट दमयंती तांबे, लेखिका अमरीन जैदी, शिक्षणतज्ज्ञ मुकुल कानिटकर यांसारखे नामवंत वक्तेही विविध सत्रांमध्ये विचारमंथन करणार आहेत.
लेखक मंच व चिल्ड्रन्स कॉर्नर
२५ ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणा-या ‘लेखक मंच’ मध्ये साहित्यिक, समीक्षक आणि तज्ज्ञांच्या उपस्थितीत चर्चासत्रे, संवाद तसेच पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होईल.
चिल्ड्रन्स कॉर्नरमध्ये एनबीटी, इंडिया च्या नॅशनल सेंटर फॉर चिल्ड्रन्स लिटरेचर (NCCL) तर्फे रोज सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत मुलांसाठी आकर्षक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यात चित्रकला स्पर्धा, गोष्टी सांगणे, वाचन सत्रे, संवाद कौशल्य कार्यशाळा, पोस्टर मेकिंग, मंडला आर्ट, व्हॉइस-ओव्हर सत्र, योगा, वेदिक गणित, कॅलिग्राफी आणि लोकनृत्य यांचा समावेश असेल.
संध्याकाळी रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम-
दररोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील. यात, सुफी व बॉलिवूड संगीत – साधो बँड, ‘मंगलमुखी – कलर्स ऑफ इंडिया’ – मिशन विश्व मातृत्व फाउंडेशन, मराठी गझल – भीमराव पांचाळे, निओ-फोक फ्यूजन – कबीर कॅफे, सूफी व सॉफ्ट रॉक – कर्णिश लाईव्ह, ओडिशी व लावणी नृत्य, जम्मू-काश्मीरचे लोकनृत्य, शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांचा ‘स्वरमंच’, ‘गर्जा महाराष्ट्र’ ची सांस्कृतिक प्रस्तुती होईल.
सर्व नागपूरकरांसाठी खुला – विनामूल्य प्रवेश-
‘नागपूर पुस्तक महोत्सव २०२५’ दररोज सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी खुला असेल. प्रवेश विनामूल्य असून पुस्तकांवर विशेष सवलतीही दिल्या जाणार आहेत. २२ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आयोजित हा पुस्तकांचा उत्सव, आवडत्या लेखकांशी भेट आणि साहित्यविश्वाचा आनंद ‘नागपूर पुस्तक महोत्सव २०२५’ मध्ये अवश्य अनुभवा
दरम्यान एनबीटीचे संचालक श्री. युवराज मलिक यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. पत्रकार परिषदेला झिरो माईल फाउंडेशनचे संचालक प्रशांत कुकडे, समय बनसोड, कल्याण देशपांडे आदींची उपस्थिती होती.









