Published On : Tue, Nov 14th, 2017

पेंच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रबी पिकासाठी पाण्याची 1 पाळी सोडणार

Advertisement

Fadnavis and Gadkari
नागपूर: जिल्हयातील पेंच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रबी पीक घेण्यासाठी पाण्याची एक पाळी सोडण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 100 दशलक्ष घनमीटर पाण्याचे नियोजन शेतकऱ्यांसाठी करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला आज दिले.

पेंच लाभक्षेत्रातील रबीचे पीक घेणाऱ्या सुमारे 15 हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतकऱ्यांनी रबी पिकासाठी पाण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांना रबी पिकासाठी पाणी मिळावे म्हणून आ. डी. मल्लीकार्जून रेडी, माजी आ. आशिष जयस्वाल व जि. प. अध्यक्षा निशा सावरकर तसेच लाभक्षेत्रातील पाणी वापर संस्थांनी पाठपुरावा केला होता.

आज नागपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी यांनी शेतकऱ्यांना रबी पिकासाठी पाणी देण्याची सूचना केली. पेंचमधून महानगर पालिकेचे पाण्याचे आरक्षण वगळून शिल्लक असलेल्या पाण्यापैकी 100 दशलक्ष घनमीटर पाण्याचे नियोजन करुन शेतकऱ्यांना रबी पिकासाठी एक पाळी पाणी सोडण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले.

या संदर्भात सोमवारीच पालकमंत्री बावनकुळे यांनी शेकतऱ्यांच्या मागणीवरुन एका बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीतही या मागणीवर विचार करण्यात आला. महापालिकेनेही पाण्याचा काटकसरीने वापर करुन नियोजन करावे व जलसंवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवावा अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली आहे.

Advertisement