Published On : Thu, Jun 10th, 2021

मनपा शाळांतील विद्यार्थी-शिक्षकांची कीर्ति सातासमुद्रापार पोहचावी : महापौर

Advertisement

गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासातच नव्हे तर विविध क्षेत्रात यशाच्या पताका रोवल्या. येथील विद्यार्थ्यांना अंतरिक्षात सर्वात कमी वजनाचे उपग्रह सोडण्याचे मान मिळाले. मनपा शाळेतील विद्यार्थी कोणापेक्षाही कमी नाही, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिध्द करुन दाखविले आहे. परंतु येथील शिक्षकांची मेहनत आणि त्यातून घडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशाचा हवा तसा प्रचार – प्रसार झाला नाही. म्हणून मनपाचा शिक्षण विभाग कायम उपेक्षित राहिला. आता या विभागाची कीर्ति सातासमुद्रापार पोहचविण्याची जबाबदारी शिक्षकांनीच उचलावी, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात गुरुवारी (ता. १०) आयोजित सन २०२० चे गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागच्या वर्षी हा कार्यक्रम होवू शकला नाही. यावेळी उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे सभापती प्रमोद तभाने, शिक्षण समितीचे सदस्य नगरसेविका संगीता गिऱ्हे, डॉ. परिणिता फुके, नगरसेवक नागेश सहारे, मो. इब्राहिम अहमद (टेलर), ज्येष्ठ नगरसेवक भूषण शिंगणे, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, मनपाच्या शाळांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन फार निराळा आहे. त्याला कारणीभूत आपणच आहोत. कारण शिक्षण विभागामार्फत होणाऱ्या चांगल्या कामांकडे आणि शिक्षण विभागाच्या उपलब्धीच्या प्रचार – प्रसाराकडे आपण लक्ष दिलेच नाही. ‘शिक्षणाच्या अधिकारा’संदर्भात जेव्हा राज्याच्या तत्कालीन प्रधान सचिवांनी नगरसेवकांची कार्यशाळा घेतली होती तेव्हा नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या संसाधनाचे कौतुक केले होते. पुणे, मुंबईच्या तुलनेत नागपूरला अधिक गुण मिळाले होते. असे असतानाही मुंबई, पुणेच चांगले असे बिंबवले जाते. कारण, या चांगल्या बाबींची प्रसिद्धी होत नाही. गेल्या पाच वर्षांपासून सभापती दिलीप दिवे यांच्या नेतृत्वात शिक्षण विभागाचा कायापालट झाला आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यात यश आले आहे. खासगी शिकवणी वर्गाच्या माध्यमातून १०० विद्यार्थी निवडून त्यांची तयारी असो की ‘सुपर ७५’चा प्रयोग असो, गुणवत्ता वाढीसाठी केलेले सारे प्रयोग यशस्वी झाले. इतकेच नव्हे तर अंतरिक्षात लहान उपग्रह सोडण्यासाठी देशभरातून १००० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती त्यात नागपूर मनपा शाळांतील दोन विद्यार्थिनी होत्या. विद्यार्थ्यांचे अनेक नैपुण्य आहेत तसेच शिक्षकांच्या मेहनतीच्याही अनेक कथा आहेत. नागपूर मनपातील शिक्षणातील या यशोगाथा सातासमुद्रापार पोहचाव्यात, याची जबाबदारी शिक्षकांसह विद्यार्थ्यांनीही घ्यावी, अशी अपेक्षा महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केली. स्वातंत्र्याच्या ७५ व्या स्थापना वर्षी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती निमित्त मनपा तर्फे विद्यार्थ्यांची शैक्षणीक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

उपमहापौर मनीषा धावडे म्हणाल्या, अधिक गुण मिळविले म्हणजे यशस्वी झालो, हा विचार विद्यार्थ्यांनी करू नये. आयुष्यातील ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करायला हवी, असा सल्ला त्यांनी दिला. स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर म्हणाले, मनपा शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांवर कमालीची मेहनत घेतात. मनपा शाळेत येणारा विद्यार्थी हा अशा कुटुंबातील असतो ज्या कुटुंबात शिक्षणाला पोषक वातावरण नसते. अशा विद्यार्थ्यांना विद्यादान करणे, हे जिकरीचे काम असून मनपा शिक्षक ते महत्‌कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे यांच्या नेतृत्वात शिक्षण विभागाने कात टाकली असून ते उत्तम कार्य करीत असल्याचा गौरवोल्लेख केला. सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी आपल्या प्रास्ताविकातून गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण विभागातर्फे सुरू असलेल्या विधायक उपक्रमांचा लेखाजोखा मांडला. मनपा शाळांत शिक्षण घेणारा विद्यार्थी गुणवत्तेत कुठेही कमी राहू नये, याची आम्ही काळजी घेत आहोत. १०० विद्यार्थ्यांची विशेष तयारी, ‘सुपर ७५’ अशा उपक्रमांसोबतच ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना टॅब दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शिक्षणाधिकारी श्रीमती प्रीति मिश्रीकोटकर यांनी प्रास्ताविकातून शिक्षण विभागाच्या कार्याची माहिती दिली.

तत्पूर्वी आदर्श शिक्षकांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, मनपाचा दुपट्टा देऊन महापौर दयाशंकर तिवारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. सुरेंद्रगड हिंदी उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मो. निसार शेख यांना मरणोत्तर आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या पत्नी परवीन सुलताना निसार शेख यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दहावी, बारावी, मागासवर्गीय आणि दिव्यांग विद्यार्थ्यांतील गुणवंत विद्यार्थ्यांनाही सोन्याचे नाणे आणि रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. संचालन शिक्षिका मधु पराड यांनी केले. आभार प्रभारी सहायक शिक्षणाधिकारी संजय दिघोरे यांनी मानले. यावेळी शिक्षण विभागाचे प्रभारी सहा. शिक्षणाधिकारी राजेंद्र सुके, विनय बगले, पायल कळमकर, प्रियंका गावंडे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक :
प्राथमिक विभाग : मो. निसार शेख (मरणोत्तर) (सुरेंद्रगड हिंदी उच्च प्राथमिक शाळा), श्रीमती विणा अनिल लोणारे (मुख्याध्यापिका तथा प्रभारी शाळा निरिक्षक), श्रीमती शबाना जकिउद्दीन सिद्दिकी (आझाद नगर उर्दु उच्च प्राथमिक शाळा), श्रीमती सुनिता गुजर (पारडी मराठी उच्च प्राथमिक शाळा नं. १), श्रीमती तेजुषा नाखले (संजय नगर हिंदी प्राथमिक शाळा).

माध्यमिक विभाग : श्री. शकील अख्तर (प्रभारी मुख्याध्यापक, कुंदनलाल गुप्ता नगर उर्दु माध्यमिक शाळा), श्रीमती रेश्मा खान (गरीब नवाज उर्दु माध्यमिक शाळा), श्री. राजेंद्र पुसेकर (डॉ. राममनोहर लोहिया शाळा), श्रीमती निता गडेकर (विवेकानंद नगर हिंदी माध्यमिक शाळा).

सुवर्ण नाणे प्राप्त विद्यार्थी :
दहावी : जयंता अलोणे (मराठी माध्यम, दुर्गानगर मनपा मराठी माध्यमिक शाळा), तृप्ती दुबे (हिंदी माध्यम, सरस्वती तिवारी मनपा हिंदी माध्यमिक शाळा), निशा नाज सादिक (उर्दु माध्यम, एम.ए.के. आझाद मनपा उर्दु माध्यमिक शाळा), अंशारा मुनिबा (इंग्रजी माध्यम, जी. एम. बनातवाला मनपा इंग्रजी माध्यमिक शाळा).

बारावी : अनस एजाज बेग (वाणिज्य शाखा, एम.ए.के. आझाद मनपा उर्दु कनिष्ठ महाविद्यालय)

रोख रक्कम पुरस्कार प्राप्त विद्यार्थी :
दहावी मराठी माध्यम : जयंता अलोणे (२५ हजार रोख, दुर्गानगर मनपा मराठी माध्यमिक शाळा), समीर जांभुळकर (१५ हजार रोख, दत्तात्रयनगर मनपा मराठी माध्यमिक शाळा), संतोष गिरी (१० हजार रोख, दुर्गानगर, मनपा मराठी माध्यमिक शाळा).

हिंदी माध्यम : तृप्ती दुबे (२५ हजार रु. रोख, सरस्वती तिवारी मनपा हिंदी माध्यमिक शाळा), मिहीर कोकर्डे (१५ हजार रु. रोख, विवेकानंद नगर मनपा हिंदी माध्यमिक शाळा), आयशा अंजुम मो. अली (१० हजार रु. रोख, सरस्वती तिवारी मनपा हिंदी माध्यमिक शाळा).

उर्दु माध्यम : निशा नाज सादिक (२५ हजार रु. रोख, एम.ए.के. आझाद मनपा उर्दु माध्यमिक शाळा), आलिया बानो सादिक (१५ हजार रु. रोख, एम.ए.के. आझाद मनपा उर्दु माध्यमिक शाळा, फिरदोस परवीन नूर (१० हजार रु. रोख, गंजीपेठ मनपा उर्दु माध्यमिक शाळा).

इंग्रजी माध्यम : अंशारा मुनिबा (२५ हजार रु. रोख, जी. एम. बनातवाला मनपा इंग्रजी माध्यमिक शाळा), तस्मिया कौसर (१५ हजार रु. रोख, जी. एम. बनातवाला मनपा इंग्रजी माध्यमिक शाळा), मोहम्मद मन्सुरी (१० हजार रु. रोख, जी. एम. बनातवाला मनपा इंग्रजी माध्यमिक शाळा).

दिव्यांग विद्यार्थी : चेतन बालुजी काकडे (१० हजार रु. रोख, डॉ. आंबेडकर मनपा मराठी माध्यमिक शाळा), शिवराज साबळे (१० हजार रु. रोख, डॉ. आंबेडकर मनपा मराठी माध्यमिक शाळा).

मागासवर्गीय विद्यार्थी : समीर जांभुळकर (२५ हजार रु. रोख, दत्तात्रय नगर मनपा मराठी माध्यमिक शाळा)

बारावी (वाणिज्य शाखा) : अनस एजाज बेग (२५ हजार रु. रोख, एम. ए. के. आझाद मनपा उर्दु कनिष्ठ महाविद्यालय), मो. अब्दुल रहमान मुबीन (१५ हजार रु. रोख, दत्तात्रय नगर मनपा मराठी माध्यमिक शाळा), अरबिया मो. मुश्ताक (१० हजार रु. रोख, दुर्गानगर मनपा मराठी माध्यमिक शाळा)