Published On : Sat, Jul 31st, 2021

जनमानस लक्षात घेउन निर्णय करणार : संदीप जोशी

– मनपा भाडेपट्टाधारकांच्या तक्रारीवर सुनावणी

नागपूर : भाडेपट्टे संदर्भात नागरिकांच्या असलेल्या अनेक तक्रारींवर दिलासा मिळावा यासाठी मनपाद्वारे नवीन धोरण तयार करण्यात येणार आहेत. या धोरण निर्मितीसंदर्भात समितीद्वारे सर्व भाडेपट्टे धारकांच्या सूचना आणि त्यांच्या तक्रारी लक्षात घेउनच अर्थात जनमानस लक्षात घेउन पुढील निर्णयार्थ सभागृहापुढे अहवाल सादर करण्यात येईल, असा विश्वास भाडेपट्टे संदर्भात महापौरांद्वारे गठीत समितीचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी व्यक्त केला.

Advertisement

शहरातील तक्रारदार भाडेपट्टेधारकांची शुक्रवारी (ता.३०) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये समितीसमक्ष सुनावणी घेण्यात आली. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष संदीप जोशी समिती सदस्य विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, नासुप्र विश्वस्त संजय बंगाले, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, नगरसेविका वैशाली नारनवरे यांच्यासह नगरसेवक लखन येरवार, नगरसेवक कमलेश चौधरी, उपायुक्त (मालमत्ता) विजय देशमुख, स्थावर अधिकारी राजेंद्र अंबारे आदी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेच्या मालकीच्या भाडेपट्ट्यावर दिलेल्या मालमत्तांकरीता भाडेपट्टा नूतनीकरण, भाडेपट्टा हस्तांतरण ना-हरकत, बांधकाम ना-हरकत, भाडेपट्टा करारनाम्यातील अटी व शर्तींचा भंग झाल्यास करावयाच्या कार्यवाही संबंधी जे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे, त्या धोरणान्वये करण्यात येत असलेल्या कार्यवाही संबंधी भाडेपट्टाधारकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने भाडेपट्टाधारकांची सुनावणी घेणेकरीता महापौरांद्वारे समिती गठीत करण्यात आलेली आहे. समितीद्वारे प्राप्त अहवालाच्या आधारे सभागृहामध्ये नवीन धोरण तयार करण्यात येणार आहे. यामध्ये समितीपुढे सुनावणी दरम्यान नागरिकांनी मांडलेल्या समस्या व त्यांच्या सूचना यांचा विचार करण्यात येणार आहे. याशिवाय प्रसंगी तक्रारदार नागरिकांपैकी जाणकारांची आवश्यक मदत घेतली जाणार असल्याचेही समिती अध्यक्ष संदीप जोशी यांनी यावेळी सांगितले.

शुक्रवारी (ता.३०) समिती समक्ष सुमारे ७० जणांची सुनावणी झाली. काँग्रेस नगर, कॉर्पोरेशन कॉलनी, न्यू कॉलनी, जाटतरोडी येथील भाडेपट्टेधारकांची यावेळी उपस्थिती होती. अनेकांनी लीज नूतनीकरणासंदर्भात तक्रारी मांडल्या. लीज नूतनीकरणासाठी अनेकांद्वारे पैसे भरण्यात आले आहेत मात्र वर्षभराचा अवधी होउनही नूतनीकरण झालेले नाही. मागील तीन ते चार वर्षात लीजची रक्कमही वाढविण्यात आली आहे, अशी तक्रार करतानाच नागपूर शहरातील मनपा, नासुप्र, नझूल आणि गृहनिर्माण मंडळ या सर्वांची लीज समान असावी, अशी सूचनाही काहींनी मांडली. नियमानुसार जनतेचे हित आणि त्यात मनपाची सर्वसमावेश भूमिका या बाबींचा विचार करूनच धोरण निर्धारित करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी उपस्थितांनी केली.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement