Published On : Fri, Nov 17th, 2017

संविधान प्रास्ताविकेचा स्तंभ संविधान चौकात उभारणार


नागपूर: संविधान चौकात संविधानाच्या प्रास्ताविकेचा स्तंभ, कोनशीला उभारण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी दिली. शुक्रवार (ता.१७) मनपा मुख्यालयात संविधान फाऊंडेशन पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.

याप्रसंगी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक धर्मपाल मेश्राम, जितेंद्र घोडेस्वार, अतिरिक्त आयुक्त आर. झेड. सिद्दीकी, संविधान फाऊंडेशनचे अध्यक्ष ई. झेड. खोब्रागडे, विभागीय अध्यक्ष न्या. पी.पी. पाटील, सचिव शिवदास वासे, कोषाध्यक्ष विलास सुटे, विभागीय सचिव अशोक गेडाम, मनपाचे कार्यकारी अभियंता अनिरूद्ध चौगंजकर, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपुरात असलेला संविधान चौक हा अशाप्रकारचे नामकरण करण्यात आलेला देशातील पहिला चौक आहे. या चौकाबद्दल जनजागृती करण्यात यावी, चौकात संविधानाच्या प्रास्ताविकेचा स्तंभ व कोनशीला उभारण्यात यावी, संविधान चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, तेथे पिण्याच्या पाण्याची सोय स्थायी स्वरूपात करण्यात यावी, संविधान चौक हे चळवळीचे केंद्र आहे. त्यामुळे तेथे उभारण्यात येणाऱ्या व्यासपीठासाठी महापालिकेद्वारे शुल्क आकारण्यात येऊ नये, २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेता २५ व २६ नोव्हेंबरला संविधान चौकात विद्युत रोषणाई करण्यात यावी, अश्या मागण्या संविधान फाउंडेशनच्या वतीने करण्यात आल्या.

याबाबत माहिती देताना स्थायी समिती सभापती संदीप जाधव म्हणाले, महापालिकेने कोनशीला उभारण्यासाठी ३० लाखाची तरतूद केलेली आहे. २०१२ मध्ये १८ फूट कोनशीला उभारण्यासाठी वाहतूक पोलिस विभागाने परवानगी नाकारली होती. आता त्याऐवजी संभाव्य दुसऱ्या जागा ठरविण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलिस विभाग व मनपा प्रशासन यांच्या संयुक्त बैठक घेऊन आणि जागांची पाहणी करून तातडीने निर्णय घेण्याची विनंती त्यांनी महापौर नंदा जिचकार यांना केली.

महापौर नंदा जिचकार यांनी, संविधान चौकात स्वच्छता ठेवण्यात यावी, तेथील स्वच्छतागृहाचे नूतनीकरण करावे, असे आदेश दिले. २५ व २६ नोव्हेंबरला चौकात विद्युत रोषणाई करण्याचेही निर्देशित केले. व्यासपीठावर आकारण्यात येणाऱ्या शुल्कासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. संविधान प्रास्ताविकेची कोनशीला उभारण्यासाठी निधीची तरतूद यापूर्वीच झालेली आहे. त्यातील अन्य अडचणी तातडीने दूर करून प्रत्यक्ष कार्य सुरूवात करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

महापौरांनी घेतलेल्या या पुढाकाराबद्दल संविधान फाऊंडेशनच्या वतीने ई.झेड. खोब्रागडे यांनी त्यांचे आभार मानले.