Published On : Fri, Jun 15th, 2018

कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा लढा सुरु राहणारः आ. अब्दुल सत्तार

जळगाव:केवळ विहिरीत पोहल्यामुळे तीन मुलांना नग्न करून त्यांना मारहाण केल्याचा व नग्न धिंड काढल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर आज माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जळगावच्या वाकडी गावात जाऊन पीडित मुलांची व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असून त्यांना रहायला घर नसल्याने त्यांना काँग्रेस पक्षातर्फे घर देऊन कुटुंबाचे पुनर्वसन करू तसेच कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरुच ठेवू असे आ. अब्दुल सत्तार म्हणाले.

जळगाव जिल्ह्यातील माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना समोर आल्यावर या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी राज्याचे माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाला तात्काळ जळगावला जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेण्याची सूचना केली होती.

प्रदेशाध्यक्षांच्या सुचनेनुसार आज सकाळी माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार, माजी मंत्री रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी खा. डॉ. उल्हास पाटील, माजी आ. शिरीष चौधरी, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या शिष्टमंडळाने आज सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास पीडित कुटुंबियाची भेट घेतली. काँग्रेस या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरु राहील असा विश्वास पीडित कुटुंबाला दिला.

भाजप सरकार दलितांवरील अत्याचार रोखण्यात अपयशी ठरले आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. पीडित कुटुंबियांवर प्रचंड दबाव आहे, त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण द्यावे व या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा अशी मागणी माजी मंत्री रमेश बागवे यांनी केली आहे.

वाकडी येथील घटना अत्यंत घृणास्पद व निंदनीय आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील बदलामुळे दलितांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. भाजप सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचारात 34 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील बदलाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष व प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केली.