नागपूर : नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी (ता. २४) सकाळी अयोध्या नगर येथील जंबुदीप नाल्याची पाहणी केली. सच्चिदानंद नगर आणि लाडीकर लेआऊट या भागातील जुबंदीप नाल्याच्या पात्राची त्यांनी पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. नाल्याचे काम सुरू असून उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी लोककर्म विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. मोहन मते उपस्थित होते.
शनिवारी २० जुलै रोजी आलेल्या मुसळधार पावसामुळे हनुमान नगर झोन अंतर्गत अयोध्या नगर येथील जंबुदीप नाल्यामध्ये पुर परिस्थिती निर्माण झाली होती. आयुक्तांनी या भागातील पाहणी करताना मनपा लोककर्म विभागाच्या अधिकाऱ्यांना शासनाकडून उर्वरित कामाकरिता निधीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. तसेच नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी नाल्याची स्वच्छता व खोलीकरण लवकर करणे आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी आऊटलेटची क्षमता वाढविण्याचे देखील आदेश दिले.
याप्रसंगी अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, सहायक आयुक्त श्री. नरेंद्र बावनकर, उपअभियंता श्री. प्रवीण आगरकर, कनिष्ठ अभियंता श्री. उमेश मदने आणि स्वच्छता निरीक्षक श्री. दिनेश कलोडे उपस्थित होते.