Published On : Wed, Mar 25th, 2020

केंद्र सरकार देशातील 80 कोटी जनतेला धान्य पुरवणार

– केंद्र सरकार देशातील 80 कोटी जनतेला धान्य पुरवणार

– दोन रूपयांत सात किलो गहू आणि तीन रूपयाने तांदूळ मिळणार

– अत्यावश्यक सेवा सुरु राहणार, अफवांवर विश्वास ठेवू नका

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

– दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी पाच फूट अंतर ठेवा

नागपुर/नई दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर मोदी सरकारनं आणखी महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सध्या निर्माण झालेली परिस्थिती पाहता सरकार सर्वसामान्यांना स्वस्तात अन्नधान्य पुरवणार आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत याबद्दल निर्णय झाला असून मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याबद्दलची माहिती दिली.

देशातल्या ८० कोटी जनतेला स्वस्त दरानं अन्नधान्य पुरवलं जाणार असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं. एका व्यक्तीमागे ७ किलो रेशन देण्यात येईल. गहू प्रतिकिलो २ रुपये दरानं, तर तांदूळ प्रतिकिलो ३ रुपये दरानं दिला जाणार आहे. पुढील ३ महिने या दरानं अन्न पुरवठा केला जाईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि गरज नसताना घराबाहेर पडू नये, असं आवाहन त्यांनी केलं. डॉक्टर, पत्रकार यांचं सध्याच्या परिस्थितीत सुरू असलेलं काम ही जनसेवा आहे. त्यामुळे त्यांना त्रास होईल, असं वर्तन कोणीही करू नये, असंदेखील जावडेकर पुढे म्हणाले.

नागरिकांना सरकारकडून स्वस्त दरात अन्नधान्याचा पुरवठा केला जाईल. पुढील तीन महिन्यांचं अन्नधान्य आधीच दिलं जाईल, अशी माहिती जावडेकर यांनी दिली. अत्यावश्यक सेवा पुरवण्याचं काम अखंडपणे सुरूच राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही चिंता करू नये. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी २१ दिवस घरात राहणं गरजेचं आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये, असं आवाहन त्यांनी केलं. नागरिकांनी एकमेकांपासून पाच फुटांचं अंतर ठेवून कोरोनाचा संसर्ग टाळावा, असंदेखील ते म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल रात्री देशवासीयांशी संवाद साधला. देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन होत असल्याची घोषणा त्यांनी केली. काल रात्री १२ पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. या प्रकरणी गृह मंत्रालयानं काही मार्गदर्शक सूचना घालून दिल्या आहेत. त्यातल्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. काही नियमांचं पालन न केल्यास थेट तुरुंगवासाची शिक्षादेखील होऊ शकते.

Advertisement
Advertisement