नागपूर : शनिवारी ११ जानेवारीला सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट (SCGT) च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित “बिझनेस बियॉंड बांऊडरीज” हा व्यापारी परिषदेचा कार्यक्रम दिमाखात पार पडला. हा विशेष कार्यक्रम उद्योजकता, व्यवसायातील नावीन्य आणि औद्योगिक कौशल्यांच्या प्रचारासाठी महत्त्वाचा ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता नेटवर्किंग चहापान आणि नोंदणी सत्राने झाली. त्यानंतर सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे अध्यक्ष अशोक दुगाडे, व्यवस्थापकीय संचालक अजित मराठे, रवींद्र प्रभुदेसाई, महासचिव सुहास फडणीस, उप-महासचिव सुभाष गोरे तसेच नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष बागेश महाजन व अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत परिषदेचे औपचारिक उद्घाटन संपन्न झाले. यावेळी उपस्थितांना सॅटर्डे क्लबचे संस्थापक स्वर्गीय माधवराव जी भिडे यांच्या प्रेरणादायी कार्याची ओळख करून देण्यात आली.
त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित तेजोनिधी या उपेंद्र साळवी लिखित पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. तसेच यावेळी सॅटर्डे क्लबच्या पुस्तिकेचे तसेच नागपूर चॅप्टरच्या पुस्तिकेचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यामध्ये खालील सत्रांचा समावेश होता.
“Building Sustainable and Scalable Businesses” स्थिर व शाश्वत व्यवसाय निर्माण करण्यावर मुंबई येथील प्रसिद्ध बिझनेस कोच कुंदन गुरव यांनी आपल्या सत्रातून उपस्थित व्यावसायिकांशी मनोरंजक पद्धतीने संवाद साधून मार्गदर्शन केले.
कार्बन क्रेडिटची निर्मिती आणि व्यवसाय कार्यशाळेमध्ये रुपेश पाटील लडे (चेयरमन, सातपुडा नॅचरल शेतकरी उत्पादक कं. अकोला अध्यक्ष एग्रीकल्चर इंजिनिअर्स सो. फॉर ट्रायबल डेव्हलपमेंट) यांनी नाविन्यपूर्ण मुद्यांनी मार्गदर्शन केले.
MSME Lean Manufacturing Tools – लीन मॅन्युफॅक्चरिंग साधनांची ओळख आणि लहान व मध्यम उद्योगांसाठी त्याचे महत्त्व मनीष खैरकर यांनी सादरीकरणाद्वारे पटवून देत विविध पैलूंवर प्रकाश टाकला.
केंद्रीय भृपृष्ठ परिवहन मंत्री श्री. नितीन गडकरी, यांनी आपल्या व्हिडिओ संदेशाद्वारे सॅटर्डे क्लबच्या कार्यप्रणालीचे कौतुक करीत मराठी व्यावसायिक व उद्योजक यांच्या उत्थानात मोठे योगदान आहे असे सांगत रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्यावसायिक परिषदेच्या यशस्वितेसाठी तसेच क्लबच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान कार्यक्रमात संदीप पाटील (IPS), विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र, तसेच यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई (पितांबरी प्रॉडक्ट्स), सुदर्शन शेंडे (विठोबा हेल्थकेअर) आणि राजेश रोकडे (रोकडे ज्वेलर्स), डॉ. निरुपमा देशपांडे (संपूर्ण बांबू केंद्र), शशिकांत चौधरी (सिरिअल आंतरप्रेन्युअर, एंजेल इन्हेस्टर आणि आयटी तज्ज्ञ) यांनी त्यांच्या यशस्वी उद्योजकीय वाटचालीचा प्रवास उपस्थितांसोबत शेअर केला.
तसेच संवाद सूत्रधारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे देत उपस्थित उद्योजक व व्यावसायिकांना यथोचित मार्गदर्शन केले. जेष्ठ संपादक श्रीपाद अपराजित यांनी सॅटर्डे क्लबचे संस्थापक कै. माधवराव भिडे यांच्या सोबतचे आपले ऋणानुबंध उलगडले तसेच सॅटर्डे क्लबची सुरुवात, आजवरचा प्रवास आणि मराठी उद्योजकांशी त्यांची बांधिलकी यावर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.