नागपूर : नागपूरच्या प्रताप नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कामगार कॉलनीत राहणारी १९ वर्षीय तरुणी तीन दिवसांपूर्वी घरातून अचानक बेपत्ता झाली. यातच आज हिंगणा येथील मोहगाव झिल्पी तलावात या मुलीचा मृतदेह पोलिसांना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही मुलगी काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती आणि त्यामुळे तिने तलावात उडी मारून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. पूजा माटे (१९ वर्षे )असे मृत मुलीचे नाव आहे.
तलावात मृतदेह तरंगताना पाहिल्यानंतर हिंगणा पोलीस ठाण्याच्या मोहगाव झिल्पी तलाव परिसरातील पर्यटकांनी हिंगणा पोलिसांना माहिती दिलीत्यानंतर तलावातून मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता असे समोर आले की, 3 दिवसांपूर्वी पूजा माटे नावाची मुलगी 25 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सुभाष नगर येथील कामगार कॉलनीतील घरातून अचानक बेपत्ता झाली. तिच्या कुटूंबियांनी प्रतापनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.पूजा माटे एका खासगी रुग्णालयात काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबात आई, मोठी बहीण आणि एक मोठा भाऊ आहे. पूजा सर्वात लहान होती. पूजाचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते आणि हा मुलगा आता दुसऱ्या मुलीशी लग्न करणार होता. त्यामुळे पूजा काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती. याच नैराश्यातून पूजाने झिल्पी तलावात उडी मारून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.