Published On : Sat, Apr 29th, 2017

आईसगोळा खात आहात ? सावधान ! 75 टक्के बर्फात सापडले जीवाणू


मुंबई
: मुंबईतील फेरीवाल्यांकडील 75 टक्के बर्फ नमुन्यांमध्ये ‘ई कोलाय’ हा जीवाणू आढळून आला आहे, तर खाद्य आणि पेय पदार्थ विकणार्‍या फेरीवाल्यांकडील 96 टक्के बर्फाचे नमुने खाण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. फेरीवाल्यांकडील बर्फ व पाणी नमुन्यांची चाचणी करण्याचे आदेश आयुक्त अजोय मेहता यांनी दिले होते. त्यानंतर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यानं खाद्य-पेय पदार्थ विक्रेत्यांची तपासणी केली. त्यात हा प्रकार उघडकीस आला आहे.

तपासणीसाठी फ्रूट ज्यूस सेंटर, ऊसाच्या रसाचे स्टॉल्स, बर्फाचे गोळेवाले, लस्सी व ताक विक्रेते, फास्ट फूड सेंटर्स आदी फेरीवाल्यांकडील बर्फनमुने तसेच उपाहारगृहातील बर्फाच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात सरासरी 96 टक्के बर्फ नमुने हे खाण्यास अयोग्य असल्याचे आढळले आहेत. याच नमुन्यांपैकी 75 टक्के नमुन्यांमध्ये आणि फेरीवाल्यांकडील 10 टक्के पाणी नमुन्यांमध्येही इ-कोलाय जीवाणू आढळले आहेत.

सामान्यपणे मानवी विष्ठेमध्ये इ-कोलाय हे जीवाणू आढळून येतात. या जीवाणूंच्या प्रादुर्भावामुळे गॅस्ट्रो, जुलाब, कॉलरा, कावीळ, टायफॉईड यासारखे आजार होऊ शकतात. हे लक्षात घेता खाद्य आणि पेय पदार्थ विकणार्‍या फेरीवाल्यांकडील पाणी पिणे, बर्फ मिश्रीत पेय पिणे व खाद्यपदार्थ खाणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकार्‍यांनी केले आहे.

पालिकेच्या सर्व 24 विभागांमध्ये सरासरी 75 टक्के बर्फ नमुन्यांमध्ये इ-कोलाय जीवाणू आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे गोवंडी, देवनार इत्यादी परिसरांचा समावेश असणार्‍या एम पूर्व या विभागात आढळले. या विभागात 100 टक्के बर्फ नमुन्यांमध्ये इ-कोलाय जीवाणू आढळून आले. खाद्य व पेय पदार्थ विकणार्‍या फेरीवाल्यांकडील बर्फ हा आईस फॅक्टरीमध्ये तयार होत असल्याने यावर कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत.