Published On : Tue, Jul 7th, 2020

वाढीव वीज बिलांविरोधात आंदोलन बिलांची जाळपोळ करून व्यक्त केला ऊर्जा विभागाचा निषेध

नागपूर: कामठी रोडवरील भिलगाव बसस्टॉपजवळ आज भाजपातर्फे व माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत वाढीव वीज बिलांविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी वाढीव वीज बिलांची जाळून होळी करण्यात आली व शासनाचा निषेध करण्यात आला.

याप्रसंगी संबंधित वीज वितरण अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी बोलताना बावनकुळे म्हणाले- कोरोनाच्या काळात गरीब, मध्यमवर्गीयांना 3 महिनांचे वीज बिल माफ करण्याची आमची मागणी होती. त्या मागणीकडे शासनाने लक्ष दिलेच नाही. उलट भरमसाठ विजेची बिले पाठवून नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. कोरोनामुळे आर्थिक अडचणीचा सामना करणारा गरीब व सामान्य माणूस भरमसाठ वीज बिलांमुळे अधिकच कोलमडला. शासनाच्या या धोरणाचा आपण निषेध करीत आहोत.

या आंदोलनात विरोधीपक्ष नेते अनिल निदान, भाजपा अध्यक्ष किशोर बेले, जि.प. प्रमुख किशोर बरडे, उमेश रडके, मोहन माकडे, धनंजय इंगोले, किरण राऊत, गोलु वानखेडे, रवींद्र पारधी, गुणवंत माकडे व भाजपाचे सर्व सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य सहभागी झाले होते.