Published On : Wed, Jun 16th, 2021

पर्यावरण संवर्धनासाठी कापडी पिशव्या उत्तम पर्याय -जिल्हाधिकारी संदीप कदम

·महिला बचतगट निर्मित कापडी पिशव्यांचे लोकार्पण
·माविमचा लॉकडाऊन मधील उपक्रम
· 20 हजार पिशवी शिलाई
·घरबसल्या 150 ते 200 रु. कमाई

भंडारा:- महिला आर्थिक विकास महामंडळ व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून टाळेबंदीच्या काळात महिला बचत गटातील सदस्यांना कापडी पिशवी शिलाईच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला असून या संधीचा योग्य उपयोग करून बचत गटांनी प्लास्टिकला पर्याय व पर्यावरण फ्रेंडली कापडी पिशव्या तयार केल्यात, ही बाब कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी संदीप यांनी केले.

महिला बचतगट निर्मित कापडी पिशव्यांचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा समन्वय अधिकारी माविम प्रदीप काठोळे, व्यवस्थापक नवप्रभा सीएमआरसी भंडारा रंजना खोब्रागडे, ललिता कुंभलकर क्षेत्रीय समन्वयक नवप्रभा सी एम आर सी भंडारा, अरुणा बांते व शोभा आंबूने सहयोगिनी नवप्रभा सीएमआरसी भंडारा यांची यावेळी उपस्थिती होती. नवप्रभा लोकसंचालीत साधन केंद्र भंडारा व शक्ती लोकसंचालीत साधन केंद्र तुमसरच्या वतीने 20 हजार कापडी पिशव्यांची शिलाईचे करण्यात आली आहे. या माध्यमातून महिलांना घर बसल्या 150 ते 200 रुपये दर दिवशी कमाई झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पॉलीथीन मुक्त कार्यक्रमाची प्रसार व प्रसिध्दीचा भाग म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यात 70 लोकसंचालीत साधन केंद्राच्या माध्यमातुन 9 लाख 55 पिशवी शिलाईचे काम महिला बचत गटातील महिलांनी केले आहे. या करिता माविम मुख्यालयातील श्रीमती गौरी दोंदे कार्यक्रम व्यवस्थापक मुंबई यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

कापडी पिशवी करिता कापड व इतर साहित्य संबंधीत लोकसंचालीत साधन केंद्रास पुरवठा करण्यात आलेला असून लॉकडाऊन व कोरोना काळात महिलांना घरबसल्या रोजगार देण्याचे कार्य माविमच्या वतीने सुरु करण्यात आलेले आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडाराच्या वतीने नवप्रभा लोकसंचालीत साधन केंद्र, भंडारा व शक्ती लोकसंचालीत साधन केंद्र, तुमसरच्या वतीने 20 हजार कापडी पिशवी शिलाईचे कार्य केले असून दिनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत स्थापित शहरातील महिला बचत गटातील 40 टेलरिंग काम करणाऱ्या महिलांना लॉकडाऊन काळात घरबसल्या रु. 150 ते 200 पर्यंत रोजगार प्राप्त करुन देण्याचा आलेला आहे.

सदर पिशव्याची शिलाई पुर्ण झाली असून महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडाराच्या वतीने जिल्ह्यातील नगरपालीका क्षेत्रातील शाळेत याचे विनामुल्य वितरण केले जाणार आहे. कोविड काळात महिलांच्या हाती काम देणे व अनुभवी महिलांची निवड करुन रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याचे कार्य माविम भंडाराच्या वतीने शक्ती लोकसंचालीत साधन केंद्र, तुमसर व्यवस्थापक श्रीमती मंदा साकोरे व नवप्रभा लोकसंचालीत साधन केंद्र, भंडारा व्यवस्थापक श्रीमती रंजना खोब्रागडे व त्यांची टीम करीत आहेत.

टाळेबंदीच्या काळात महिला बचत गटातील महिलांच्या हाताला काम मिळावे व त्यांची आर्थिक परवड होऊ नये या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. यामूळे बचत गटातील महिलांना रोजगार तर मिळाला आहेच सोबतच पर्यावरणाचेही रक्षण होणार आहे. प्लास्टिक पिशव्यांना या कापडी पिशव्या योग्य पर्याय ठरतील. -प्रदीप काठोळे समन्वयक माविम, भंडारा