नवी दिल्ली : ७७ व्या प्रजासत्ताक दिनाला अवघे काही दिवस उरले असून देशभर जोरदार तयारी सुरू आहे. दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या भव्य समारंभासाठी यंत्रणा सज्ज होत असतानाच, संभाव्य दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. याच दरम्यान दिल्ली पोलिसांनी सहा संशयित दहशतवाद्यांचे फोटो असलेले पोस्टर जारी केल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.
दिल्ली पोलिसांनी जाहीर केलेल्या पोस्टरमध्ये पहिल्यांदाच दिल्लीशी संबंधित असलेल्या एका संशयित दहशतवाद्याचा फोटो समाविष्ट करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रत्येक संशयित हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दिल्लीसोबतच मुंबई, पुणे, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू आणि अमृतसर या प्रमुख शहरांमध्येही सुरक्षेचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
मोहम्मद रेहानवर सुरक्षा यंत्रणांचे लक्ष-
या सहा संशयित दहशतवाद्यांमध्ये मोहम्मद रेहान याचा समावेश असून तो ‘अलकायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट’ (AQIS) या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती आहे. रेहान अनेक दिवसांपासून बेपत्ता असून तो भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची योजना आखत असल्याचा संशय गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे त्याचा शोध अधिक तीव्र करण्यात आला आहे.
कर्तव्य पथावर कडक सुरक्षा, तंत्रज्ञानाचा वापर-
२६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य पथ आणि परिसरात अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. विविध गुप्तचर संस्थांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार संशयित हालचालींवर सातत्याने नजर ठेवली जात आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि फेस रेकग्निशन सिस्टिम (FRS) च्या मदतीने संशयित व्यक्ती ओळखण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संशयास्पद व्यक्ती किंवा वाहन आढळताच संबंधित यंत्रणांना तात्काळ अलर्ट मिळणार आहे.
पाकिस्तानातून कट रचल्याची माहिती-
गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये तळ ठोकून बसलेले दहशतवादी भारतात हल्ल्याची योजना आखत असल्याचे संकेत मिळाले आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या आधी संपूर्ण देशभर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांनीही सतर्क राहून संशयास्पद हालचाली तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.









