
नागपूर: महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रियेच्या रूपांतरित फेरीअंतर्गत उर्दू माध्यमाच्या विनाअनुदानित शाळेतील इंग्रजी विषयाच्या शिक्षक पदासाठी श्री. फैजान रहेमान शेख यांची अधिकृतरीत्या शिफारस करण्यात आली आहे.
सदर शिफारशीच्या अनुषंगाने मनपा आयुक्त डॉ. विपिन यांच्या सक्षम मान्यतेने श्री. फैजान रहेमान शेख यांना शिक्षण सेवक पदावर नियुक्त होऊन कार्यभार स्वीकारण्यासाठी नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आला. हा नियुक्ती आदेश मा. शिक्षण विशेष समिती सभापती श्रीमती संतोषदेवी दीपक लढ्ढा आणि शिक्षणाधिकारी श्री. अमित भदाणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी शिक्षण विशेष समिती सभापती श्रीमती संतोषदेवी दीपक लढ्ढा यांनी नवनियुक्त शिक्षण सेवक श्री. फैजान रहेमान शेख यांना हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
२९ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला मिळाली गती
नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात सन १९९७ पासून इयत्ता ९ वी व १० वीच्या शिक्षक भरतीसंदर्भातील पवित्र पोर्टलची प्रक्रिया दीर्घकाळापासून प्रलंबित होती. जवळपास २९ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रक्रियेला शिक्षण सभापती श्रीमती संतोष देवी दीपक लढ्ढा यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि पुढाकारामुळे प्राधान्याने गती देण्यात येत आहे.
या महत्त्वपूर्ण कार्यात अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम एम. आणि शिक्षणाधिकारी श्री. अमित भदाणे यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे. तसेच उपशिक्षणाधिकारी श्री. सुभाष उपासे आणि उपशिक्षणाधिकारी श्रीमती सीमा खोब्रागडे यांच्यासह शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांच्या समन्वयातून ही प्रक्रिया वेगाने पुढे नेली जात आहे.
आगामी दोन महिन्यांत इतर वर्गांच्या शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची अपेक्षा
शिक्षण विशेष समिती सभापती श्रीमती संतोषदेवी लढ्ढा यांनी सांगितले की, इयत्ता ६ वी, ७ वी आणि ८ वीच्या माध्यमिक स्तरावरील शिक्षक भरतीसंबंधित माहिती (डेटा) देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासोबतच प्राथमिक विभागातील शिक्षक भरतीसंबंधित माहिती (डेटा) देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे.
त्यांनी अशी आशा व्यक्त केली की, आगामी दोन महिन्यांत या वर्गांचा डेटा पूर्ण करून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया पुढे नेणे शक्य होईल. यामुळे महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर करण्यास तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यास महत्त्वपूर्ण मदत होईल.
शिक्षण सभापती श्रीमती संतोष देवी दीपक लढ्ढा यांनी सांगितले की, नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि विद्यार्थ्यांना अधिक चांगले शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे हे त्यांचे प्राधान्य आहे. या दिशेने शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आणि समन्वयाने भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.



