
नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीने राजकीय समीकरणांसह सट्टेबाजारातील अंदाजांनाही धक्का दिल्याची चर्चा आहे. भाजपचे सुधाकर कोहळे यांच्या विजयाच्या शक्यतेवर मोठी रक्कम लावणाऱ्या बुकींचे निकालानंतर गणित बिघडल्याचे सांगितले जात आहे. या निवडणुकीदरम्यान नागपुरात सुमारे ९५ ते १०० कोटी रुपयांचा सट्टा लागल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे, नितेश कराळे ऊर्फ कराळे मास्तर यांच्याशी संबंधित सट्ट्यावर पैसे लावणाऱ्यांना काही व्यवहारांत फायदा झाल्याची चर्चा आहे.
नागपुरातील सट्टेबाजारात निवडणुकीच्या निकालांवरही मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल होत असल्याचे सांगितले जाते. शहरात ५०० हून अधिक लहान-मोठे बुकी सक्रिय असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. क्रिकेट सामन्यांपासून लोकसभा, विधानसभा आणि विधानपरिषद निवडणुकांपर्यंत विविध घटनांवर सट्टा लावला जातो. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही उमेदवारांच्या संभाव्य विजयावरून सुरुवातीपासूनच अंदाज बांधले जात होते.
सट्टेबाजारातील सुरुवातीच्या समीकरणांमध्ये काँग्रेसचे अभिजित वंजारी यांना पसंती मिळत असल्याचे सांगितले जाते. मात्र, १७ ऑक्टोबरनंतर भाजपचे सुधाकर कोहळे यांच्याकडे सट्टेबाजांचा कल वाढल्याची माहिती समोर आली. २३ ऑक्टोबरला कोहळे यांचा दर ६० पैसे, तर वंजारी यांचा ८० पैसे होता. २५ ऑक्टोबरपर्यंत कोहळे यांचा दर ५५ पैसे आणि वंजारी यांचा ६० पैसे झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या दरांमुळे कोहळे यांच्या विजयाची शक्यता अधिक असल्याचा अंदाज बांधून अनेकांनी त्यांच्या बाजूने पैसे लावल्याची चर्चा आहे.
दरम्यान, २७ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून काही बुकींनी व्यवहार थांबवल्याचे सांगितले जाते. २८ ऑक्टोबरला काही ठिकाणी अभिजित वंजारी यांच्या बाजूने सट्टा स्वीकारला जाऊ लागला. मतमोजणी पुढे सरकताच निकालाचे चित्र बदलल्याने आधीच्या अंदाजांवर आधारित व्यवहार करणाऱ्यांना आर्थिक फटका बसल्याची चर्चा सुरू झाली.
कराळे मास्तर यांच्याबाबतही सट्टेबाजारात वेगळी परिस्थिती दिसून आल्याचे सांगितले जाते. सुरुवातीला त्यांच्या नावाला फारसे महत्त्व दिले गेले नव्हते. त्यामुळे त्यांच्या बाजूने पैसे लावणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी होती. मात्र, मतमोजणीच्या काळात काही विशिष्ट मतांच्या टप्प्यांवर त्यांच्या बाजूने ७० पैशांहून अधिक दर दिल्याची माहिती आहे. या व्यवहारांमध्ये काही सट्टेबाजांना फायदा झाल्याची चर्चा आहे.
पदवीधर मतदारसंघाच्या निकालामुळे निवडणुकीपूर्वी बांधलेले अंदाज आणि सट्टेबाजारातील समीकरणे यांच्यातील तफावत समोर आल्याचे बोलले जात आहे. राजकीय निकालानंतर नागपुरातील सट्टेबाजारातील कथित उलाढाल आणि बुकींच्या नफ्या-तोट्याची चर्चा रंगली असली, तरी ९५ ते १०० कोटींच्या व्यवहारांचा दावा, प्रत्यक्ष नुकसान किंवा झालेला नफा यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.



