Published On : Wed, Mar 21st, 2018

उन्हापासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना करा

Advertisement


नागपूर: नागपूरमध्ये उन्हाची तीव्रता खूप जास्त राहते. हिट ॲक्शन प्लॅन अंतर्गत सर्व झोन स्तरावर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा. जनजागृतीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात यावे, असे निर्देश मनपाचे अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी दिले.

‘हिट ॲक्शन प्लॅन’वर चर्चा करण्याकरिता मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात बुधवारी (ता. २१) आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. अनिल चिव्हाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, सहायक आयुक्त स्मिता काळे, सुवर्णा दखने, प्रकाश वराडे, सुभाष जयदेव, हरिश राऊत व अन्य अधिकारी उपस्थित होते.

अपर आयुक्त रवींद्र कुंभारे पुढे म्हणाले, हिट ॲक्शन प्लॅन राबविण्यासाठी झोनस्तरावर आवश्यक त्या बैठकी घेण्यात याव्यात. आवश्यक त्या पूर्तता करण्यात याव्या. ज्या ठिकाणी कामे सुरू आहे, मोठ्या प्रमाणावर मजूर कार्यरत आहे, अशा ठिकाणी तात्पुरते शेड बनवून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी. हवामान अंदाजाची प्रसिद्धी व्यापक प्रमाणावर करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.


तत्पूर्वी वैद्यकीय अधिकारी तथा हिट ॲक्शन प्लॅनचे समन्वयक डॉ. नंदकिशोर राठी यांनी हिट ॲक्शन प्लॅन संदर्भात सादरीकरण केले. हिट ॲक्शन प्लॅन अंमलात आणल्यामुळे उन्हापासून होणाऱ्या त्रासाची तीव्रता कशी कमी झाली, याबाबत विवेचन केले.