Published On : Thu, Jan 16th, 2020

पारडी पुलाच्या कामाला गांभीर्याने घ्या : महापौर संदीप जोशी

महापौर, आयुक्तांनी अधिकाऱ्यांना फटकारले : कामाचा वेग वाढविण्याचे निर्देश

नागपूर : ज्यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशातील रस्ते वेगाने बदलत आहे, त्या ना. नितीन गडकरी यांच्या शहरातील पारडी पुलाचे काम अत्यंत संथ गतीने होत आहे, ही बाब लाजीरवाणी आहे. खोळंबलेली वाहतूक आणि वाढलेले अपघात आता यापुढे नागरिक सहन करणार नाही. तातडीने पुलाचे काम पूर्ण करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Advertisement

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे पारडी येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मात्र या कामाची गती अत्यंत संथ असल्यामुळे दररोज वाहतुकीची कोंडी होते. परिसरातील नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास होतो. अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. यासंदर्भात महापौर संदीप जोशी, आमदार कृष्णा खोपडे यांनी गंभीर दखल घेत संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारासोबत बैठक घेतली. बैठकीला उपमहापौर मनीषा कोठे, आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, प्रकल्प विशेष समितीचे सभापती अभय गोटेकर, लकडगंज झोनचे सभापती राजकुमार सेलोकर, लकडगंज झोनचे सहायक आयुक्त सुभाष जयदेव, कार्यकारी अभियंता अमीन अख्तर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपमहाव्यवस्थापक समय निकोसे, नगरसेवक दीपक वाडीभस्मे उपस्थित होते.

आमदार कृष्णा खोपडे यांनी उड्डाणपुलाच्या कामावर नाराजी व्यक्त करीत त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल सांगितले. मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने भूसंपादनाच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. हवे ते सहकार्य मनपा करीत आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे संथगतीने होत असलेल्या कामाला गांभीर्याने घेतले जात नाही. कंत्राटदाराला साधा दंडही ठोठावला नाही. आतातरी गांभीर्याने घ्यावे, असे निर्देश दिले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपमहाव्यवस्थापक समय निकोसे यांनी सांगितले की, नुकतीच एक बैठक झाली असून त्यात कंत्राटदाराला मार्च २०२० पर्यंत काम पूर्ण करण्याची ताकीद देण्यात आली आहे. यासंदर्भात वरिष्ठांना अहवाल देऊन तातडीने काम पूर्ण करु, अशी ग्वाही दिली.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement