Published On : Wed, Oct 18th, 2017

कर्जमाफी योजनेपासून पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या : चंद्रशेखर बावनकुळे

 
  • सुमारे एक लाख लाभार्थी शेतकऱ्यांनी भरले ऑनलाईन अर्ज
  • 25 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्र, कुटूंबांचा सत्कार
  • नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन अनुदान
  • कर्जमाफी एतिहासिक आणि कर्तव्यपूर्ती
  • तालुकास्तरावर लोकप्रतिनिधींच्या हस्ते कर्जमाफी प्रमाणपत्र


नागपूर: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केल्यानंतर दिवाळीपूर्वी कर्जमाफीच्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करुन शेतकऱ्यांना सन्मानाने कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र दिल्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला आहे. या महत्वकांक्षी व एतिहासिक कर्जमाफी योजनेपासून पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिल्यात.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमुक्ती प्रमाणपत्राचे वितरण तसेच कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांचा सत्कार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे, समीर मेघे, डॉ. मिलिंद माने तसेच जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते.

कर्जमाफीच्या योजनेची अंमलबजावणी दिवाळीपूर्वी करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार प्रत्यक्ष कर्जमाफीला सुरुवात होत असल्याचे सांगतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आजपर्यंतच्या सर्वाधिक कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभ होणार असून राज्यासाठी हा महत्वाचा आणि एतिहासिक क्षण आहे. जिल्हयातील सुमारे 1 लाख 5 हजार 177 लाभार्थी शेतकऱ्यांना पात्रतेच्या निकषानुसार लाभ मिळणार असून सुमारे 835 कोटी 55 लक्ष रुपयाची कर्जमाफी मिळणार आहे.


जिल्हयातील प्रातिनिधीक स्वरुपात सर्व तालुक्यातील 25 शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येत असून या योजनेमधून कोणीही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही. कर्जमाफी प्रमाणपत्र देताना या योजनेसाठी पात्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत प्रमाणपत्र सन्मानपूर्वक देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी तालुकास्तरावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करुन प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देवून गौरव करावा अशी सूचना केली. शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महसूल व सहकार विभागाने केलेल्या कार्याचा गौरव करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्हयातील सर्व शेतकरी व नागरिकांतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

कर्जमाफीमुळे मिळाला दिलासा, शेतकऱ्यांच्या भावूक प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना जाहीर केली आणि दिवाळीपूर्वीच प्रत्यक्ष अंमलबजावणी करुन मोठा दिलासा दिला आहे. कर्जाची परतफेड करु नशकल्यामुळे नवीन कर्ज मिळत नव्हते परंतु कर्जमाफी मिळाल्यामुळे सातबारा कोरा झाला आणि आता नवीन कर्जही मिळणार आहे त्यामुळे नव्या उमेदिने शेती पिकविणार असल्याचा विश्वास कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला. शासनाने दिलेल्या कर्जमाफीच्या योजनेबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करताना अत्यंत भावूकपणे सालई मेंढयाचे मनोहर पांडुरंग या शेतकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. कर्जाच्या पूनर्गठनामुळे 1 लक्ष 17 हजार 8 रुपयाची कर्ज मिळाली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री. मनोहर मानकर यांचा सपत्नीक सत्कार करुन गौरव केला.


शासनाने दिलेल्या कर्जमाफी योजनेमध्ये उमरेड तालुक्यातील बोरगाव कलांद्री येथील केशव शंकर बानाईत या शेतकऱ्याकडे बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे थकीत कर्ज होते. या कर्जामुळे निराश झालेल्या बानाईत यांना 1 लाख 40 हजार 680 रुपयाचा थकीत कर्ज माफ झाले आहे. कर्ज माफ झाल्याचे प्रमाणपत्र घेताना अत्यंत भावूकपणे शासनाने दिलेल्या कर्जमुक्तीबद्दल पालकमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींचे आभार मानले. शेतकऱ्यासाठी कर्जमाफी योजना म्हणजेच नव्याने जगण्याची उमेद मिळाली असून शेती उत्पादनाला प्रोत्साहन मिळणार आहे. कर्जमाफीची योजना पूर्णपणे पारदर्शीपणे पध्दतीने शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहे. तसेच नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 25 हजारपर्यंत प्रोत्साहन रक्कम जमा होणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेचा निकषामध्ये बसणाऱ्या शेतकऱ्या शेवटच्या शेतकऱ्यांना लाभ मिळेपर्यंत ही योजना बंद होणार नाही. तसेच कर्जमाफी संदर्भात सूचना असल्यास त्या उपसमितीकडे पाठवून त्याचा विचार करण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिली.

नागपूर जिल्हयातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये बोरगावच्या अजय दादाजी ढोले यांचे 90 हजार 806 रुपयाचे कर्जमाफ झाले आहे. त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतले होते. तसेच कामठीच्या पावनगाव येथील शेतकरी श्रीमती किरण दिनेश भारती व नांदाचे बाबा भगवान रासेकर यांचे अनुक्रमे 22 हजार 410 व 28 हजार 453 रुपयेचे कर्जमाफ झाले आहे. एक लाखापैशा जास्त कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये कळमेश्वर तालुक्यातील कोहळीचे तुळशीराम पांडेकर यांना 1 लाख 35 हजार 478, दहेगावचे मधुकर मानकर यांना 1 लाख 38 हजार 679, भिवापूरचे संतोष शेळके यांचे 1 लाख 30 हजार 295, पंढरी वैरागडे यांचे 1 लाख 29 हजार 849 रुपयाचे कर्जमाफ झाले आहे.

प्रारंभी विभागीय संहनिबंधक प्रविण वानखेडे यांनी स्वागत केले. तर आभार जिल्हा उपनिबंधक सतीश भोसले यांनी मानले. यावेळी जिल्हाअग्रणी बँकेचे प्रबंधक अयुब खान, तसेच कृषी, सहकार, महसूल आदी विभागाचे अधिकारी मोठया संख्येन उपस्थित होते.