Published On : Sat, Sep 16th, 2017

फटाके विक्रेत्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ !

fatake
नागपूर:
किरकोळ फटाके विक्रेत्यांचे नुकसान होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात येईल, असे आश्वासन नागपूर महानगरपालिकेचे अग्निशमन विशेष समितीचे सभापती ॲड संजय बालपांडे यांनी दिले. किरकोळ फटाका विक्रेत्यांना तात्काळ परवाने देण्यासाठी शनिवारी (ता.१६) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, सहप्रमुख अग्निशमन अधिकारी बी.पी.चंदनखेडे, अग्निशमन विभागाचे सर्व स्थानक अधिकारी, किरकोळ फटाका विक्रेता असोसिएशनचे प्रतिनिधी विरेंद्र शाहू प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री. बालपांडे म्हणाले, फटाक्याचे दुकान लागणे ही आमचीपण इच्छा आहे. परंतु कायद्याप्रमाणे जे योग्य असेल तोच निर्णय घेण्यात येईल. अधिका-यांच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेऊ, असेही बोलपांडे यांनी सांगितले. विक्रेत्यांनी आपला नोंदणी अर्ज भरावा आणि अर्जाचे शुल्कही भरावे. महानगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी व कर्मचारी निरिक्षण करतील व नंतरच दुकानाला ना हरकत प्रमाणप्रत्र द्यायचे की नाही ते ठरवतील असे बालपांडे यांनी बैठकीत सांगितले.

निवासी क्षेत्रात फटाक्याचे दुकान लावता येणार नाही असा उच्च न्यायालयाचा आदेश आहे. हा आदेश स्थायी फटाक्यांच्या दुकानांसाठी आहे. किरकोळ व अस्थायी स्वरूपात ज्यांचे दुकान आहे, त्यांच्यासाठी तो नियम लागू होत नाही, असे किरकोळ फटाका विक्रेता असोसिएशनचे प्रतिनिधी विरेंद्र शाहू यांनी सांगितले. जर किरकोळ फटाका विक्रेत्यांना जर परवाना मिळाले नाही तर त्यांचे नुकसान होईल, असेही शाहू बोलताना म्हणाले. काही दुकानदार परवाने न घेता हे रस्त्यावर फटाके विक्रीसाठी बसतात त्यामुळे अपघाताची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती फटाका विक्रेता प्रतिनिधींनी केली. त्यावर सभापती बालपांडे बोलताना म्हणाले, जे अनधिकृतपणे फटाके विक्री करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. विक्रेत्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ. यातूनच विक्रेत्यांसाठी त्यांच्याच फायद्याचा चांगला मार्ग काढु. यासाठी विक्रेत्यांचा सहभाग आवश्यक आहे, असेही सभापती बालपांडे बोलताना म्हणाले.