Published On : Mon, Sep 3rd, 2018

अग्निशमन नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करा!

Advertisement

नागपूर : महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियमांतर्गत अग्निशमन विभागाच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा, असे निर्देश अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती लहुकुमार बेहते यांनी दिले.

अग्निशमन व विद्युत संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता. ३) महानगपालिकेच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत समितीच्या उपसभापती वर्षा ठाकरे, सदस्य निशांत गांधी, वंदना भुरे, वनिता दांडेकर, अनिल गेंडरे, आशा उईके, ममता सहारे, उपायुक्त नितीन कापडणीस, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उपमुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे, उपअभियंता (प्रकल्प) शकील नियाजी, धनंजय मेंडुलकर, उपअभियंता (विद्युत) ए.एस. मानकर, कनिष्ठ अभियंता प्रकाश रूद्रकार, सामान्य प्रशासन विभागाचे निगम अधीक्षक मदन सुभेदार यांच्यासह सर्व अग्निशमन स्थानक अधिकारी उपस्थित होते.

यावेळी अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती लहुकुमार बेहते म्हणाले, महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाय योजना अधिनियमांतर्गत व्यावसायिक दुकाने, हॉटेल, मॉल आदींसह निवासी इमारतींमध्ये अग्निशमन सुविधा असणे अनिवार्य आहे. यासंबंधी तपासणी करून ज्या इमारतींमध्ये अग्निशमन सुविधा नसेल त्या इमारतींमधील पाणी व विद्युत पुरवठा खंडीत करण्याचे अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती लहुकुमार बेहते यांनी निर्देशित केले. अग्निशमन विभागाकडे असलेल्या १८३१ इमारत धारकांना टप्प्याटप्प्याने नोटीस जारी करण्यात यावे. कारवाईमध्ये व्यावसायिक प्रतिष्ठानांना सुरूवातीला प्राधान्य देण्यात यावे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आपल्या इमारतींमध्ये अग्निशमन सुविधा लावून घेता येईल, असेही ते म्हणाले.

त्रिमूर्तीनगर येथे बांधकाम सुरू असलेल्या अग्निशमन स्थानकावरील डीपी नुकतीच स्थानांतरित करण्यात आली. मात्र या स्थानावरील बांधकामाला गती मिळावी, यासाठी अडथळे दुर करून सदर स्थानक येत्या नोव्हेंबरपर्यंत पूर्णत्वास नेण्याचे निर्देशही यावेळी सभापती लहुकुमार बेहते यांनी दिले.

अग्निशमन विभागात सुरू असलेली कर्मचारी भरती प्रक्रियाही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे सभापती श्री. बेहते यांनी यावेळी निर्देशित केले. मनपाच्या अग्निशमन विभागात करण्यात येणाऱ्या विविध ६५ पदभरतीसाठी एकूण ८४५ अर्ज विभागाकडे आले असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी बैठकीत दिली. लकडगंज व वाठोडा अग्निशमन स्थानकाचे प्रस्तावित बांधकाम, सोलर वॉटर हिटर व इतर योजनांचाही यावेळी अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती लहुकुमार बेहते यांनी आढावा घेतला.