नागपूर : नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी (ता.९) सकाळी लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनमधील स्वच्छता कार्याची पाहणी केली. त्यांनी कामावर गैरहजर असलेल्या कामचुकार स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश झोनचे उपायुक्त श्री मिलिंद मेश्राम आणि श्री प्रकाश वराडे यांना दिले. त्यांनी हजेरी स्टॅंडमध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेतला आणि पूर्वसूचनेविना गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे निर्देश दिले.
आयुक्तांनी आठ रास्ता चौक, आर.एस. कॉन्व्हेंट, बजाज नगर आणि इतर ठिकाणी स्वच्छता कार्याची पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी कुठेही कचऱ्याचे ढिगारे दिसू नये, याबाबत सक्त ताकीद दिली. हिरवा कचरा (Green West) त्वरित उचलला जावा याकरिता अतिरिक्त यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सफाई कर्मचाऱ्यांद्वारे उचलण्यात आलेला कचरा पुन:श्च प्रभागात सार्वजनिक जागी कचरा न टाकता थेट भांडेवाडी डम्पिंग यार्ड ला पाठविणे आवश्यक आहे. यासाठी कंत्राटदारांनी कॉम्पॅक्टरद्वारे कचरा थेट भांडेवाडी डम्पिंग यार्डला पाठविण्या संबंधी आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट निर्देश दिले.
लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनमधील दररोज गैरहजर राहणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याबाबत मनपा आयुक्तांनी, उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन विभागाचे डॉ.गजेंद्र महल्ले, झोनल स्वच्छता अधिकारी श्री. रामभाऊ तिडके, श्री. दीनदयाल टेंभेकर आणि स्वच्छता निरीक्षक श्री. राजेंद्र शेट्टी तसेच सहायक आयुक्तांची जबाबदारी निश्चित केली आहे.