मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला अपयश मिळाले. हे पाहता आघाडीत बिघाडीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. आज (११ जानेवारी) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर महाविकास आघाडीत पुन्हा मतभेद निर्माण होणार अशी चर्चा आहे.
ठाकरे गटाच्या या भूमिकेमुळे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची पुढील भूमिका काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. आता यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले.
आघाडीत असतानाही जेव्हाही महापालिकेच्या निवडणुका येत होत्या तेव्हा आम्ही त्या वेगवेगळ्याच लढत होतो. मागची महापालिकेची निवडणूक आम्ही वेगवेगळीच लढलो होतोत. त्यात नवीन काय आहे? महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. सर्व निवडणुका जर सर्वजण आपआपल्या सोईने लढवायला लागले तर कार्यकर्त्यांनी काय सतरंज्या उचलायच्या का? मग त्यांना न्याय कधी मिळणार? त्यामुळे महापालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यांना न्याय मिळायला हवा, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
दरम्यान मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. मग काय होईल ते होईल? एकदा आम्हाला आमची ताकद आजमावायची आहे. आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. नागपूरला सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आम्हाला उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील संकेत दिले आहेत, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत प्रसार माध्यमांना म्हणाले आहेत.