Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Dec 20th, 2017

  ओखी वादळाच्या प्रश्नावरुन आमदार सुनिल तटकरेंचा सरकारवर हल्लाबोल


  नागपूर: ओखी वादळामुळे कोकणसह उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि शेतीचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले. त्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामेही सरकारने केले नाही शेतकऱ्यांच्याबाबतीत इतके असंवेदनशील सरकार वागले असून आता या शेतकऱ्यांना सरसकट मदत दयावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनिल तटकरे यांनी विधानपरिषदेमध्ये केली.

  राज्यातील रस्त्यांमध्ये पडलेल्या खड्डयांसाठी महाराष्ट्रभर फिरणाऱ्या संवेदनशील महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोकणाला खड्डयात घालण्याचे काम करु नये ते पाप घेवू नका असा सल्ला सुनिल तटकरे यांनी दिला. आज ओखी वादळामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार सुनिल तटकरे यांनी सरकारला धारेवर धरले. कोकणावर अन्याय करणाऱ्या सरकारचा सुनिल तटकरे यांनी धिक्कार करत निषेधही केला.

  निसर्गातील बदलामुळे कोकणातील बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. त्या नुकसानीकडे सरकारने लक्ष दिले नाही. झालेल्या नुकसानीचे पंचनामेही साधे घालण्यात आले नाहीत. सरकारच्या या असंवेदनशीलतेबाबत मी सभागृहामध्ये चर्चेच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त करत आहे. सरकारला ओखी वादळ येणार याचा अंदाज मिळाला होता परंतु हे सरकार ओखी वादळ येईपर्यंत ढिम्मपणे पहात राहिले. मच्छीमारांच्या बोटींना फक्त लाल बावटे दाखवण्यापलीकडे सरकारने काही केले नाही असा आरोप सुनिल तटकरे यांनी केला.

  ओखी वादळ येणार हे माहित असूनही कोकणातील महसुल यंत्रणा आणि त्याची व्यवस्था पाहणारे जिल्हाधिकारी काय करत होते असा सवाल सुनिल तटकरे यांनी करत सरकारचे वाभाडे काढले. ओखी वादळ आलेच शिवाय कोकणसह उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्येही पावसानेही हजेरी लावली होती. त्यामुळे आंबा, काजू, सुपारी, नारळ, द्राक्षबागा, स्ट्रॉबेरी पीक आणि मच्छीमारांचेही मोठयाप्रमाणात नुकसान झाले आहे. एवढे मोठे आस्मानी-सुलतानी संकट शेतकऱ्यांवर आले असतानाही सरकारची संवेदनशीलता कुठे गेली होती. आम्ही सभागृहामध्ये लक्षवेधी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे घालण्यास सुरुवात करण्यात आली. तेच नुकसान झाल्यावर पंचनामे का करण्यात आले नाहीत. मी अधिकाऱ्यांना पंचनामे घालण्याबाबत फोन केले त्यावेळी पंचनामे घालण्यासाठी सरकारकडून आदेश नसल्याचे अधिकारी सांगत होते. सरकारची कोकणाबाबतची संवेदनशीलता का मेली आहे असा संतप्त सवाल सुनिल तटकरे यांनी केला.

  यावर्षी पाऊस उशिरापर्यंत राहिल्यामुळे भातपीकांचेही मोठयाप्रमाणात नुकसान झाले आहे. हा पाऊस सतत पडला नसता तर कोकणातील शेतकऱ्यांनी विक्रमी भाताचे उत्पादन घेतले असते. कोकणातील भातशेतीही टिकवण्यासाठी आहे. फक्त फळबागायतीतूनच शेतकरी उत्पन्न घेतो. त्यामुळे कोकणसह नाशिकपर्यंतच्या माझ्या सर्व शेतकऱ्यांना सरकारने मदत दयावी. आज मदत जाहीर केली तर तुमची शेतकऱ्यांविषयीची संवेदना जागृत आहे हे स्पष्ट होईल असेही सुनिल तटकरे म्हणाले.

  ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या तामिळनाडूला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिली. मी म्हणणार नाही की पंतप्रधानांनी कोकणाला भेट दयावी परंतु राज्याचे पालक असलेल्या मुख्यमंत्र्यांनी किंवा महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी निदान कोकणाला भेट दयायला हवी होती. त्यांच्या भेटीतून कोकणाला काही मिळणार आहे असेही नाही असा टोला सुनिल तटकरे यांनी यावेळी लगावला.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145