Published On : Fri, Mar 31st, 2017

आला उन्हाळा, प्रकृती सांभाळा !

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांसाठी तातडीने उपचार व्हावे, यासाठी विशेष सोयी- सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. नागपूर शहर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. त्यातील एक म्हणजे प्रचंड कडक उन्हाळा. येथे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या देखील तापमानासोबत वाढत जाते. सध्या नागपूरचा पारा 44 अंशावर पोहचला आहे. अशा वाढत्या तापमानात मेयो येथे उष्माघाताच्या रुग्णावर करण्यात येणाऱ्या उपचाराबाबत माहिती देतांना मेयोच्या औषध वैद्यक शास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. प्रशांत जोशी यांच्याशी केलेली चर्चा….

सध्या सूर्य सर्वत्र सर्वाधिक प्रखरतेने आग ओकत आहे. भारतीय उपखंडातील दुपारचा पारा 40 अंशाच्यावर केव्हाच पोहचला आहे. यालाच ‘इक्विनॉक्स फिनॉमिना’ असे म्हणण्यात येते. वाढत्या तापमानामुळे येत्या 4-5 दिवस सूर्य अगदी डोक्यावर असल्यामुळे डॉ. प्रशांत जोशी यांनी सूर्यापासून आपला बचाव करण्यासाठी दुपारच्यावेळी शक्यतोवर घराच्या बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.

उष्माघातामुळे कुणी बळी पडू नये म्हणून शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी 10 खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. याला ‘कोल्डवार्ड’ म्हणण्यात येते. येथे अद्ययावत 4 डेझर्ट कुलर्स बसविण्यात आले आहेत. ‘कोल्डवार्ड’ 24 तास सुरु राहतो. उष्माघाताचा रुग्ण आल्यावर तातडीने त्याच्यावर उपचार सुरु करण्यात येतात. उष्माघाताच्या रुग्णाचे प्रथम लक्षण म्हणजे शरीराचे वाढलेले तापमान. यात शरीराचे तापमान 105 फॅरनाईट देखील जाते. यात रुग्णाची शुद्ध हरपते. अंगाला झटके येतात. यासाठी शरीराचे अचूक तापमान करण्यासाठी उष्माघाताच्या रुग्णांना ‘रेक्टल थर्मामीटर¬’ ने तपासले जाते. उष्माघातामुळे रुग्णांची त्वचा गरम आणि कोरडी पडते. तसेच जीभ कोरडी आणि डोळे खोल जातात. पायात गोळे येतात. सर्वप्रथम ‘कोल्डवार्ड’ मध्ये तातडीने रुग्णांचे शरीराचे तापमान कमी करण्याचा उचार करण्यात येतो. यामध्ये रुग्णांची काख, मान आणि कपाळावर ‘आईस पॅक’ लावण्यात येतो. आईस पॅक लावतांनाच दोन्ही बाजूने पंखे लावतात. तसेच पोटात नळीद्वारे आईस वॉटर सोडण्यात येते. त्यालाच ‘गॅस्ट्रिक लव्हाज’ म्हणतात. उष्माघाताचा ताप हा कोणत्याही संसर्गामुळे होत नाही. त्यामुळे त्यावर ‘पॅरासिटेमॉल’ घटक असणारे औषध काम करीत नाही. रुग्णाच्या शरीरातील उष्णता वाढल्यामुळे फुप्फूस, किडनी आणि लिव्हरवर ताण पडतो. अशावेळी रुग्णाला अतिदक्षता विभागात हलविण्यात येते. यात उशिर झाल्यास रुग्ण जागीच दगावतो.

उष्माघातापासून वाचण्यासाठी करावयाचे उपचार
1) अतिनील किरणांचा सर्वाधिक त्रास या काळात होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त पाणी पिणे कधीही चांगले मात्र, अतिशय थंड पाणी पिणे टाळा.
2) दुपारी 12.00 जे 3.00 या वेळेत फिरु नये.
3) फिकट रंगाचे सैल कपडे वापरा, हाफ बाह्यांचे कपडे टाळा.
4) डोक्यावर नेहमी पांढरा रूमाल अथवा टोपी वापरा. तसेच गॉगल, छत्री आणि बुटांचा वापर करा.
5) उष्णता वाढल्यास तोंडालाही रूमाल बांधा, नाक, कान पांढऱ्या रूमालने झाका.
6) एसीतून लगेच उन्हात किंवा उन्हातून लगेच एसीत जाऊ नका, पंधरा मिनिटं सावलीत काढल्यानंतर उन्हात किंवा उन्हातून सावलीत 15 मिनिटं उभं राहिल्यानंतर एसी किंवा कुलरच्या हवेत जा.
7) ज्यांना ह्रदयविकाराचा तसेच मधूमेहाचा त्रास आहे, त्यांनी नियमित तपासणी करावी. आहारामध्येही रसदार फळांचा वापर करावा. तसेच मांसाहार कदापिही करु नये.
8) मद्य सेवन, चहा- कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट फार ड्रिंक्स घेवू नका, त्यामुळे शरीर डिहायड्रेट होते.
9) उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका.
10) दही, ताकाचा आहारात समावेश करा. बाहेर जाताना बाटलीत पाणी घेऊन जा आणि गरज वाटल्यास पाणी पीत राहा. शक्योतर उन्हात जाणे टाळा.
11) आपले घर थंड ठेवा, पडदे, झडपा, सनशेड बसवा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा.
12) पंख्याचा वापर करा, थंड पाण्याने आंघोळ करा.
13) पार्किंग केलेल्या वाहनामध्ये मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका.
14) जनावरांना सावलीत ठेवा व पुरेसे पाणी द्या.
15) उष्माघाताची लक्षणे जसे थकवा कमजोरी जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
16) मदतीसाठी हेल्पलाईन नं. 1077/108 वर त्वरित संपर्क साधावा.

उन्हाच्या प्रखरतेपासून आपल्या प्रियजनांना वाचविण्यासाठी पुरेशी काळजी घ्या. तसेच वरील संदेश जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचवा.