वर्धा – रोबोटिक असिस्टेड सर्जरी म्हणजेच रोबोटिक उपकरणांच्या सहाय्याने करण्यात येणारी शस्त्रक्रिया ही आयुर्विज्ञानाच्या क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान म्हणून ओळखली जाते. हे तंत्रज्ञान केवळ अवघड किंवा गुंतागुंतीच्याच प्रक्रियेतच नव्हे तर सामान्य शस्त्रक्रियांसाठीही उपयोगात आणता येते, याचा प्रत्यय सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात प्रथमच रोबोटिक प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या हर्निओप्लास्टी शस्त्रक्रियेने दिला.
गत आठवड्यात हर्नियाचा त्रास असलेले हिंगणघाट येथील ४६ वर्षीय तसेच यवतमाळ येथील ५० वर्षीय रुग्णाना सावंगी मेघे रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी भरती करण्यात आले होते. इंग्वायनल हर्नियाचे निदान झालेल्या या दोन्ही रुग्णांची रोबोटिक असिस्टेड सर्जरी करण्याचा निर्णय मुख्य वैद्यकीय अधीक्षक तथा रोबोटिक सहाय्यक प्रक्रियेतील तज्ज्ञ शल्यचिकित्सक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांनी घेतला. रुग्णांच्या सर्व तपासण्या व चाचण्या पूर्ण केल्यानंतर रोबोटिक असिस्टेड सर्जरी विंग वर्सियस प्रणालीचा वापर करीत एकाच दिवशी दोन्ही रुग्णांची हर्निओप्लास्टी यशस्वीरित्या करण्यात आली. या रोबोटिक हर्निओप्लास्टी शल्यचिकित्सा प्रक्रियेत डॉ. महाकाळकर यांच्यासह रोबोटिक असिस्टेड सर्जन डॉ. जय धर्माशी, डॉ. आर.के. शिंदे, डॉ. शिवानी क्षीरसागर, डॉ. स्वाती देशपांडे आणि डॉ. संजीव ज्ञानचंदानी यांचा सहभाग होता. शस्त्रक्रियेनंतर वेदनारहित या दोन्ही रुग्णांना त्यांच्या निवासस्थानी सुरळीत पोचविण्यात आले. रोबोटिक असिस्टेड सर्जरी प्रणालीचा वापर करून यापूर्वी कोलेसिस्टेक्टोमी, अपेंडेक्टॉमी, पायलोप्लास्टी, नेफ्रेक्टॉमी आदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून हर्निओप्लास्टी प्रथमच करण्यात आली आहे.
रोबोटिक प्रणाली सर्वच शस्त्रक्रियांसाठी उपयुक्त – डॉ. महाकाळकर
आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात मागील १०० दिवसांच्या कालावधीत विभिन्न प्रकारच्या चिकित्सेसाठी २२ रोबोटिक सहाय्यक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक उपकरणांचा वापर असलेली ही रोबोटिक प्रणाली वापरून कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रिया करता येतात, असे डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांनी सांगितले. परंपरागत शस्त्रक्रियेत उद्भवणाऱ्या मर्यादांवर मात करण्यासाठी आणि शल्यचिकित्सकांच्या क्षमतांमध्ये वाढ करून अचूकता आणण्यासाठी रोबोटिक सहाय्यक शस्त्रक्रिया विकसित करण्यात आली आहे. पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये वेळेची व श्रमाची बचत होते. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाचा भरती कालावधी कमी होत असून शस्त्रक्रियेत व शस्त्रक्रियेनंतर गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता नगण्य असते आणि शस्त्रक्रियेनंतरच्या वेदनेचे प्रमाणही अत्यंत कमी असते. या शस्त्रक्रियेत रक्तस्त्राव कमी होत असून संसर्गाचा धोका कमी असतो आणि जखम लवकर भरली जात असल्याने आजच्या काळातील ही अत्यंत कार्यक्षम आणि दर्जेदार उपचार सेवा आहे, असेही डॉ. महाकाळकर यांनी सांगितले.