Published On : Tue, Aug 4th, 2020

साखर कारखाना स्फोट प्रकरण; एकाच वेळी पाचजणांवर अंत्यसंस्कार

नागपूर : घरोघरी अश्रूंना वाट मोकळी करून देणारी माणसे. कुणी एकमेकांना आधार देत टाहो फोडत सावरत होते. असे झालेच कसे आणि आता आमचे होणार तरी कसे असा हृदय पिळवटून टाकणारा प्रश्न पाचही घरी वारंवार, क्षणाक्षणाला उपस्थित केला होत होता. शंभरावर वस्ती असलेल्या या छोट्याशा गावात शनिवारी रात्रीपासून अनेकांच्या घरात चूल पेटली नाही.

चिमुकल्यांना अन्नाचे दोन घास मिळावे, यासाठीच त्या गावाची चूल यदाकदाचित पेटली. शनिवारी नागपूर जिल्ह्यातील बेला (ता.उमरेड) येथील मानस अ‍ॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच जणांचा काही सेकंदातच जीव गेला. लीलाधर शेंडे(४६), वासुदेव लडी (३४), मंगेश नौकरकर (२३), सचिन वाघमारे (२७), प्रफुल्ल मून (२५) यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले होते

रविवारी सकाळपासूनच पाचही कुटुंबातील आप्तस्वकीय, मित्रपरिवार अंत्यविधीसाठी गावात पोहोचले. दुसरीकडे संपूर्ण गावातील खिडक्यांमधून डोकावणारे चेहरे आणि दरवाजात उभे राहून मृतदेह गावात आणले जाणार असल्याने अनेकजण प्रतीक्षा करीत होते. निदान निरोपाच्या अखेरच्या भेटीत चेहरा तरी बघता येणार या विचारांचे चक्र सुरू होते. दुसरीकडे आता येणार थोड्या वेळात आणले जाणार या प्रतीक्षेत दुपारचे ४ वाजले. अखेरीस पाचही जणांचे पार्थिव गावात आणण्यात आले.

पुन्हा घरोघरी रडारड सुरू झाली. अश्रू सावरण्यासाठीही कुणी नव्हते. अख्खा गाव रडत होता. लागलीच तडकाफडकी अंत्यसंस्कारासाठी तयारी झाली आणि एकाचवेळी पाचही जणांची अंत्ययात्रा सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास निघाली. एकाचवेळी पाच जणांचे अंत्यसंस्कार बघणाऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी सारेच भावुक झाले होते.

पैसा मिळणार, जीवांचे काय?
शनिवारी सकाळीच वासुदेव लडी याने आपल्या मुलांना लवकर परत येतो असे सांगत कारखाना गाठला. लीलाधर शेंडे यांनी पत्नी आणि तीन मुलींना येतो म्हणून सांगितले. सचिन वाघमारे, प्रफुल्ल मून, मंगेश नौकरकर हे तिन्ही कुटुंब आपला मुलगा नेहमीप्रमाणे घरी परत येईल, या आशेवर होते. परंतु शनिवारी दुपारच्या घटनेनंतर पाचही जणांचे थेट मृतदेहच रविवारी घरी पोहोचल्याने सर्वांनाच धक्का बसला. निरोपाच्या अखेरीस आपल्या पतीचा, पित्याचा आणि आपल्या मुलाचा चेहरासुद्धा बघता आला नाही, या वेदनेने दु:ख डोंगराएवढे झाले होते. पैसा मिळणार पण त्या गेलेल्या जीवांचे काय, ती माणसे परत मिळतील काय, असा सवाल प्रत्येकाच्या अंतर्मनात डोकावत होता.