नागपूर – नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) येथील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडालेली असताना, अमृता फडणवीस यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आपण पूर्वी कार्यरत असलेल्या अॅक्सिस बँकेतही अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या, अशी माहिती त्यांनी दिली.
नागपूर येथे ‘नारी वंदन अधिनियम महिला बुद्धिजीवी संमेलन’नंतर माध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. उद्योग-व्यवसाय क्षेत्रात अशा घटना घडणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र वेळेत तक्रार नोंदवून आणि अंतर्गत सूचना पद्धतीचा वापर केल्यास संबंधितांवर कायदेशीर तसेच संस्थात्मक कारवाई होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
अशा घटनांमध्ये पीडितांनी गप्प न बसता तात्काळ पुढे येणे आवश्यक आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत बाब पोहोचवणे आणि योग्य पद्धतीने तक्रार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
परतवाडा येथील लैंगिक घोटाळा तसेच ‘लव्ह जिहाद’ संदर्भातही त्यांनी प्रतिक्रिया दिली. हे प्रकार अत्यंत गंभीर असून, मुलींनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले. भारतीय संस्कृती व मूल्यांची जाण तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
राजकारणात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी ३३ टक्के आरक्षण गरजेचे असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. काहीजण विरोध करत असले तरी महिलांना त्यांचा हक्काचा वाटा मिळालाच पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या कार्यक्रमाला रवींद्र चव्हाण, नीता ठाकरे, दयाशंकर तिवारी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.










