Published On : Sat, Jul 8th, 2017

मनपाच्या हागणदारी मुक्त शहर साकारण्याच्या प्रयत्नांना यश

Advertisement


नागपूर: शहरात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांसाठी सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालय उभारुन शहराला हागणदारीमुक्त करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने केलेल्या प्रयत्नांना यश आले असल्याचे शनिवारी (ता. ८ जुलै) दिसून आले. मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर यांच्यासह शहरातील धरमपेठ, धंतोली, नेहरुनगर, हनुमाननगर झोन अंतर्गत येणाऱ्या हागणदारी स्थळांची आकस्मिक पाहणी केली.

धरमपेठ झोनच्या पाहणी दौऱ्यादरम्यान सहायक आयुक्त महेश मोरोणे यांची उपस्थिती होती. पाहणी दौऱ्यात स्मार्ट अॅन्ड सस्टेनेबल सिटी या संस्थेच्या लिना बुधे, शुभांगी पडोळे होत्या.

झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडे शौचालय नसल्याने त्यांना उघड्यावर शौचास जावे लागत होते. मात्र मनपाने शहरातील विविध भागात सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करुन दिली. विशेष म्हणजे तेथे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मनपाच्या या पुढाकाराला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला.

शनिवारी आय़ुक्तांनी केलेल्या दौऱ्यादरम्यान एकही व्यक्ती उघड्यावर शौचास जाताना आढळला नाही, हे विशेष. आय़ुक्तांनी सकाळी साडेसात वाजता सुदामनगरी, अंबाझरी येथील शौचालय आणि खुल्या मैदानाची पाहणी केली. नागरिक शौचालयाचा वापर करीत आहे का ? य़ाबद्दलची विचारपूसही यावेळी आयुक्तांनी स्वतः पुढाकार घेऊन केली. यावेळी मनपाने केलेल्या सोयीबद्दल नागरिकांनी मनपाचे आभार मानले. त्याची देखभालही आम्ही करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी आयुक्तांनी सुदामगरी येथील खुल्या मैदानाच्या सुशोभीकऱणाचे निर्देश सहायक आय़ुक्त महेश मोरोणे यांना दिले.

यानंतर आयुक्तांनी फुटाळा येथील स्वच्छतेची पाहणी केली. हजारी पहाड येथील मनपाच्या शाळेतील शौचालयाची पाहणी केली. शाळेच्या मुख्याध्यापिकांनी शाळा परिसरात सायंकाळी असामाजिक तत्वांमुळे शाळेचे नुकसान होत असून सुरक्षा भिंत बांधून देण्याची विनंती केली. यावर आयुक्तांनी तातडीने शाळेकरिता सुरक्षा भिंत बांधण्याचे निर्देश दिले.

यानंतर हजारी पहाड, वायुसेना जवळ असलेल्या झोपडपट्टीतील नागरिकांसाठी शौचालय नसल्याने उघड्यावर शौचास जावे लागत होते. मात्र मनपाच्या पुढाकाराने नागरिकांना सामुदायिक शौचालय देण्यात आल्याने आपली शौचालयाची समस्या सुटली असल्याचे यावेळी नागरिकांनी आय़ुक्तांना सांगितले. भीवसेनखोरी येथील नागरिकांच्या समस्यादेखिल शौचालयामुळे सुटल्य़ा असल्याचे दौऱ्यादरम्यान निदर्शनास आले.

यानंतर आय़ुक्तांनी मोक्षधाम घाट येथील सार्वजनिक शौचालयातील स्वच्छता आणि सुविधांची पाहणी केली. नागरिक शौचालयाचा वापर करतात का, तसेच किती वेळपर्यंत शौचालय सुरु असते आदी माहिती शौचालय व्यवस्थापकाकडून जाणून घेतली. जाटतरोडी येथील हागणदारी स्थळाची पाहणीही यावेळी आयुक्तांनी केली. परिसरातील लहान मुलांना आपण शौचास कुठे जाता, परिसरात कोणी उघड्यावर शौचास जातो का अशी विचारणा केली. स्वयंसेवी संस्थेच्या लिना बुधे आणि शुभांगी पडोळे यांनीही नागरिकांकडून शौचालयांची स्थिती आणि नागरिक वापरतात का, य़ाबद्दल माहिती जाणून घेतली. यानंतर आय़ुक्तांनी सिद्धेश्वरी येथील हागणदारी स्थळाची पाहणी केली. नेहरुनगर झोन अंतर्गत येणाऱ्या गिडोबा नगर येथील हागणदारी स्थळाच्या पाहणीदरम्यान मनपाच्या वतीने उभारण्यात आलेल्या सामुदायिक शौचालयामुळे कोणी उघड्यावर जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी उघड्यावर शौच करणाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईचा धसका नागरिकांनी घेतला असल्याचे यावेळी स्वच्छाग्रहीने आयुक्तांना सांगितले.


अतिक्रमण आणि स्वच्छतेवर आयुक्तांची करडी नजर

हागणदारी स्थळांच्या आकस्मिक पाहणी दौऱ्यादरम्यान हजारी पहाड येथील मनपाच्या जागेवर पानठेला होता. या ठेल्याला तातडीने हटविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. कारवाई टाळण्यासाठी स्वतः अतिक्रमण काढा, असे आयुक्तांनी अतिक्रमणधारकाला खडसावले. यासोबतच मेडिकल परिसरातून जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्यावर आयुक्तांचे लक्ष गेले. यावेळी आय़ुक्तांनी अधिका-याला कचरा तातडीने हटवा असे निर्देश दिले.

आयुक्तांनी व्यक्त केली नाराजी

शहरातील हागणदारी स्थळांवर शौचालय नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आले. मात्र काही ठिकाणी नागरिकांनी संख्या अधिक असल्याने मोबाईल टॉयलेट देखिल उपलब्ध करुन देण्यात आले होते. मात्र या टॉयलेटच्या दाराच्या कड्या आणि नळाच्या तोट्या गायब आढळल्या. यावर आय़ुक्तांनी नाराजी व्यक्त केली. आपल्या आरोग्यसाठीच आपल्याला शौचालय उपलब्ध करुन देण्यात आले असून मनपाने याचा वापर करणे आणि याची देखभाल करणे नागरिकांचे कर्तव्य असल्याचे आय़ुक्तांनी परिसरातील नागरिकांना सांगितले. तसेच शौचालयात पाण्याचा उपयोग करणे, वापर झाल्यावर कडी लावणे, गुटखा आणि तंबाखु शौचालयाच्या दारावर न थुंकणे आदींची काळजी घ्यावी असेही सांगितले.