धनंजय मुंडे व शिक्षक आमदारांच्या प्रयत्नांना यश

Advertisement


नागपूर: 1 व 2 जुलै, 2016 अन्वये मुल्यांकन करुन अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या सुमारे 158 प्राथमिक शाळा व 504 तुकड्यांवरील 1417 शिक्षक व 631 माध्यमिक शाळा व 1605 तुकड्यांवरील 5373 शिक्षक व 2180 शिक्षकेत्तर अशा एकूण 8970 कर्मचाऱ्यांना 20 टक्के अनुदान मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व शिक्षक आमदारांच्या प्रयत्नानंतर याबाबतची घोषणा आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत केली. तसेच ऑनलाईन मूल्यांकन झाल्यानंतर अनुदानास पात्र ठरणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालय/उच्च माध्यमिक शाळा, आणि तुकड्यांची यादी माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडे प्राप्त झाली असून हे अधिवेशन संपण्यापूर्वी ही पात्र यादी घोषित करण्यात येईल, असे शिक्षणमंत्री तावडे यांनी आज घोषित केले.

राज्यभरातील 5 हजार पेक्षा अधिक शिक्षक उपरोक्त मागण्यांसाठी मागील 4 दिवसांपासून नागपूर येथे धरणे आंदोलन करीत होते, याबाबत मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी पुढाकार घेऊन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना या प्रकरणी मध्यस्थी करण्याची विनंती केली, त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने शिक्षणमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली, त्यात आ.काळे यांच्यासह आ.ना.गो.गाणार, आ. श्रीकांत देशपांडे, आ.सुधीर तांबे, आ.दत्ता सावंत, आ.बाळाराम पाटील, शिक्षक संघटनेचे प्रा.टी.एम.नाईक, खंडेराय जगदाळे, वेणुनाथ कडु आदींनी भाग घेतला.

हाच विषय मुंडे यांनी सभागृहात मांडुन या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले, त्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उपरोक्त घोषणा करतानाच 20 टक्के अनुदान प्रकरणी मंत्रीमंडळाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पुढील अनुषंगिक कार्यवाही तात्काळ केली जाईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

दोन्ही निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर सुमारे 100 कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे, 14 जून 2016 पूर्वी अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळांना अटी व शर्तींच्या अधिन राहून 20 टक्के अनुदान देण्याचा मंत्रीमंडळ निर्णय 30 ऑगस्ट 2016 च्या बैठकीत घेण्यात आला होता, तोच निर्णय 1 व 2 जुलै, 2016 च्या पात्र शाळांसाठी लागू राहील, असेही तावडे यांनी सांगितले.

मागण्या मान्य झाल्यामुळे मागील 4 दिवसांपासून सुरू असलेले धरणे आंदोलन मागे घेण्यात आले असून, या सकारात्मक निर्णयाबद्दल मुंडे, काळे यांनी शिक्षणमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.