नागपूर: पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे स्थानिक रा.पै. समर्थ स्टेडियम, चिटणवीस पार्क येथे आयोजित बाल दिनाच्या कार्यक्रमात मनपा शाळांतील विद्यार्थ्यांनी कलांची मुक्त उधळण केली. आगळ्यावेगळ्या पद्धतीने आयोजित या कार्यक्रमात उपस्थित मनपा शाळांतील विद्यार्थ्यांच्या गर्दीने स्टेडियम फुलून गेले होते. सर्व शाळांमधून वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळेच्या मुलींच्या संघाने तर संजयनगर हिंदी माध्यमिक शाळेच्या मुलांच्या संघाने पथसंचलन मध्ये बाजी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले.
मुलींच्या गटात द्वितीय क्रमांक लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळेने पटकाविला तर दुर्गानगर माध्यमिक शाळा तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. मुलांच्या गटात द्वितीय क्रमांक विवेकानंद नगर हिंदी माध्यमिक शाळेने तर तृतीय क्रमांक जयताळा माध्यमिक शाळेने पटकाविला.
कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी मंचावर विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, अग्निशमन व विद्युत समितीचे सभापती ॲड. संजयकुमार बालपांडे, गांधीबाग झोन सभापती सुमेधा देशपांडे, हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय, शिक्षण समितीच्या उपसभापती स्नेहल बिहारे, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, शिक्षण समितीचे सदस्य राजेंद्र सोनकुसरे, स्वाती आखतकर, विजय झलके, नगरसेविका विद्या कन्हेरे, ममता सहारे, सरला नायक, उपायुक्त रवींद्र देवतळे, शिक्षक संघाचे सचिव देवराव मांडवकर, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, सहायक शिक्षणाधिकारी कुसूम चाफलेकर, शिक्षक संघाच्या कोषाध्यक्षा मलविंदर कौर लांबा आदी उपस्थित होते.
कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, विद्यार्थ्यांचे वय हे खेळण्याबागडण्याचे असते. अभ्यासासोबत त्यांच्यातील कलागुणांना वाव देणे महत्त्वाचे असते. मनपाच्या शिक्षण विभागाने यावर्षी उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांतील कलावंतांना वाव देण्याचा केलेला प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. याबद्दल त्यांनी शिक्षण विभागाचे अभिनंदन केले.
विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनीही शिक्षण विभागाचे अभिनंदन करत यावर्षी सुरू झालेली ही परंपरा भविष्यातील विद्यार्थी घडविण्यात महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन केले.
शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे म्हणाले, आजकालचा विद्यार्थी हा मोबाईल, लॅपटॉपमध्ये हरविला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ते ज्ञान आवश्यक असले तरी खेळ, कला आणि मनोरंजन या बाबीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. यासाठी मनपाच्या शिक्षण विभागातील कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षकांनी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. बालदिनाच्या या भव्य आयोजनाची परंपरा मनपा पुढेही सुरू ठेवेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी केले. संचालन मंजुषा फुलंबरकर आणि अरुणा गावंडे यांनी केले. क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी यांनी समन्वयन केले. आभार संजय महाला यांनी मानले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
यावेळी दहावी व बारावीच्या परीक्षेत माध्यमनिहाय प्रथम येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. दहावीत मराठी माध्यमात प्रथम बॅ. शेषराव वानखेडे विद्यानिकेतनची विद्यार्थिनी तन्वी मोटघरे (२५,०००/-), द्वितीय जयताळा माध्यमिक शाळेचा विद्यार्थी ऋतिक धोंगडे (१५,०००/-), तृतीय बॅ. शेषराव वानखेडे विद्यानिकेतनची विद्यार्थिनी मोनिका नेवारे आणि जयताळा माध्यमिक शाळेचा विद्यार्थी आशीष येडे (१०,०००/-), हिंदी माध्यमात प्रथम संजयनगर हिंदी माध्यमिक शाळेचा विद्यार्थी भूपेंद्र शाहू, (२५,०००/-), द्वितीय विवेकानंदनगर हिंदी माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी रोशनी शुक्ला (१५,०००/-), तृतीय लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी जान्हवी सोनकुसरे (१०,०००/-), उर्दू माध्यमातील प्रथम साने गुरुजी उर्दू माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी सादिया परवीन अब्दुल कादीर (२५,०००/-), द्वितीय हुसैन खान सलीम खान (१५,०००/-) आणि तृतीय एम.ए.के. आझाद उर्दू माध्यमिक शाळेचा विद्यार्थी मो. रशीद रझा (१०,०००/-), दिव्यांग विद्यार्थ्यांमधून प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी प्रीती ब्राह्मणकर (१०,०००/-) यांचा सत्कार करण्यात आला. बारावीत कला शाखेतील प्रथम एम.ए.के. आझाद उर्दू माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी आतीया बानो अब्दुल करीम कुरेशी, द्वितीय शाझिया कौसर मकबूल अहमद अंसारी आणि तृतीय साने गुरुजी उर्दू उच्च माध्यमिक शाळेचा निखात परवीन जिब्राईल खान यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन सन्मानिकत करण्यात आले. वाणिज्य शाखेतून प्रथम आलेल्या एम. ए. के. आझाद उर्दू उच्च माध्यमिक शाळेची सिमरन शेख शकील हिला २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्या विषयांचा निकाल शंभर टक्के निकाल लागला त्या विषय शिक्षकांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अनाथालयात साजरा केला बाल दिन साजरा
मनपाच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे बाल दिनानिमित्त अनाथाश्रम येथे चिमुकल्यांना फळे आणि उपयुक्त साहित्य वितरण करण्यात आले. तसेच डॉ. अनुराधा रीधोरकर यांनी आरोग्याबद्दल व आहाराबद्दल चिमुकल्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महिला बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे व अंजली निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चिमकुल्यांना भेटवस्तु देण्यात आल्या. यावेळी उपसभापती श्रद्धा पाठक, नगरसेविका वंदना भगत, साक्षीराऊत, श्वेत निगम यांची उपस्थिती होती.
सांस्कृतिक कार्यक्रम
यावेळी मनपाच्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर केले. पन्नालाल देवाडिया हिंदी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगत नृत्याच्या माध्यमातून ‘शिक्षा मेरा अधिकार’ हा संदेश दिला. विवेकानंद नगर हिंदी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करीत उपस्थितांची दाद मिळविली. शिवणगाव मराठी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कोळी नृत्य सादर करीत उपस्थित विद्यार्थ्यांनाही ठेका धरायला लावला. वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळेने केलेल्या घागरा नृत्यावर सारेच थिरकले. बॅ. शेषराव वानखेडे विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिक तर लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम सादर करून सर्वांची मने जिंकली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.