Published On : Mon, Apr 27th, 2020

विदर्भातील विद्यार्थी-नोकरदारांना शासनाने त्यांच्या घरी पोचविण्याची व्यवस्था करावी बावनकुळे यांची मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांकडे मागणी

नागपूर: विदर्भातील अनेक विद्यार्थी आणि नोकरीसाठी विदर्भाबाहेर असलेले नागरिक कोरोना संचारबंदीमुळे आपल्या घरापासून दूर अडकून पडलेले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना आपापल्या जिल्ह्यात जाण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात एक हेल्पलाईन सुरु करून या विद्यार्थी आणि नागरिकांना त्यांच्या घरी सुखरूप पोहाचवण्याची व्यवस्था करण्याची मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना एका पत्रातून केली आहे.

विदर्भातील अनेक तरूण मुंबई आणि पुणे भागात कोरोना संसर्गामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे तरुण घरी परत येण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण लॉकडाऊनमुळे त्यांना ते शक्य झाले नाही. विदर्भातील अशा सर्वच विद्यार्थी आणि नोकरदार तरुणांना शासनाने स्वखर्चाने त्यांच्या घरी पोहोचवून त्यांची आरोग्यतपासणी करावी. जिल्ह्यात हेल्पलाईन सुरु केल्यास याची माहिती शासनाला मिळेल. तसेच या नागरिकांनाही आपल्या घरी पोहोचता येईल.

लॉकडाऊनमुळे या विद्यार्थी आणि तरुणांचे प्रचंड हाल सुरु आहेत. त्यांची उपासमारही होत आहे. यापैकी अनेकांशी माझा संपर्क झाला असून त्यांनी शासनाने आम्हाला घरी पोचण्यास मदत करावी अशी मागणी केली आहे. घराबाहेर असल्यामुळे या विद्यार्थी व तरुणांची कोणतीही व्यवस्था परजिल्ह्यात होऊ शकत नाही. या विद्यार्थी आणि नोकरदारांचे कुटुंबिय हे चिंतित आहेत. यासाठी शासनाने शक्य तितक्या लवकर या सर्वांना आपापल्या जिल्ह्यात स्वत:च्या घरी सुरुरूप पोहाचविण्याची व्यवस्था करावी अशी मागणी बावनकुळे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे.