
नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या Indian Institute of Information Technology Nagpur (आयआयआयटी) मध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थ्याने सोमवारी सायंकाळी सुमारे ४.३० वाजता चौथ्या मजल्यावरील गॅलरीतून उडी मारून जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत विद्यार्थ्याची ओळख श्रेयस चंद्रकांत माने (रा. मीनेवारी, कोल्हापूर) अशी झाली आहे. विशेष म्हणजे, घटनेच्या वेळी विद्यार्थ्याच्या तोंडावर टेप लावलेली असल्याचे समोर आल्याने प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, महाविद्यालयात सध्या परीक्षा सुरू असून सोमवारीच त्याचा पेपर होता. अशा परिस्थितीत त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मित्रपरिवार आणि सहाध्यायांच्या म्हणण्यानुसार, तो नेहमीप्रमाणेच वागत होता आणि कोणतीही तणावाची लक्षणे दिसून आली नव्हती.
घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलिसांसह महाविद्यालय प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
या घटनेमागील नेमके कारण काय, याचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कसून तपास करत असून लवकरच सत्य समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








