Published On : Sat, Aug 29th, 2020

राज्यात सशक्त क्रीडा धोरण राबविणार – सुनील केदार

Advertisement

क्रीडा दिनानिमित्त विभागीय क्रीडा संकुलातn फिट इंडिया फ्रीडम रन चे उद्घाटन

नागपूर : महाराष्ट्र राज्य आज क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा प्रकारात आपले अधिपत्य गाजवत आहे. राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रच्या खेळाडूंना नावलौकिक मिळावा या करिता संपूर्ण राज्यात सशक्त क्रीडा धोरण राबविणार असल्याचे मनोगत राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात क्रीडा दिनानिमित्त आयोजित समारोहात व्यक्त केले. सर्वप्रथम देशाचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी आपल्या वक्तव्यात श्री. केदार यांनी महाराष्ट्रातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखविण्याकरिता राज्यात क्रीडा धोरण राबविणार असून राज्यात लवकरच सर्व सुविधायुक्त क्रीडा विद्यापीठ बालेवाडी (पुणे) येथे स्थापन होणार असल्याचे सांगितले. या विद्यापीठात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू, प्रशिक्षक, पंच, आहारतज्ज्ञ व क्रीडा क्षेत्रात योगदान देणारे तज्ज्ञ घडविण्यात येणार असून त्याद्वारे राज्याचे नाव उंचाविणार असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

कोरोना काळात सर्व खेळाडूंनी स्वतःला सशक्त करण्याकरिता शक्यतोवर घरीच व्यायाम करावा. आपला आहार सकस ठेवावा. जेणेकरून या कोरोना महामारी नंतर खेळाडूंना आपला नैसर्गिक खेळ खेळण्यास कुठलीही अडचण जाणार नाही. क्रीडा दिनानिमित्त विभागीय क्रीडा विभागातर्फे नागपूरकरांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी “फिट इंडिया फ्रीडम इंडिया” या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये प्रत्येक व्यक्तीने आपली शारीरिक तंदुरुस्तीसाठी आपल्या वेळेनुसार सायकलिंग, धावणे, चालणे इत्यादी प्रकार करायचे आहे.

यावेळी नागपुरातील विविध राष्ट्रीय स्तरावरील सहभाग घेतलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. भविष्यात ‘मानकापूर स्टेडियम’ला आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल बनविण्याचा मानस असून त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही श्री. केदार यांनी दिली. यावेळी एनसीसी समुह मुख्यालयाचे प्रशासकीय अधिकारी कर्नल एस. एस. सोम, उपसंचालक क्रीडा व युवा सेवा, नागपूर विभाग अविनाश पुंड, पवन मेश्राम उपस्थित होते.