
बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी सुरुवातीपासूनच भक्कम आघाडी घेतली असून त्यांच्या विजयाची दिशा स्पष्ट होताना दिसत आहे. दुसऱ्या फेरीअखेर त्या तब्बल १६,५४३ मतांनी आघाडीवर असून प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या फरकाने मागे टाकले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघात सहानुभूतीची लाट आणि पवार कुटुंबाचे पारंपरिक वर्चस्व या दोन्ही घटकांचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे ही निवडणूक राज्याच्या राजकारणात विशेष लक्षवेधी ठरली आहे.
मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली असून प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. सुमारे ३०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडत आहे. प्रत्येक फेरीचा निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
निवडणुकीपूर्वी जय पवार यांनी बारामतीत भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यांच्या या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापले होते. मतदानाच्या दिवशी ग्रामीण आणि शहरी भागातून मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याने विक्रमी टक्केवारीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दुसऱ्या फेरीअखेर मिळालेल्या मतांनुसार, सुनेत्रा पवार आघाडीवर असून इतर उमेदवारांना अत्यल्प मते मिळाली आहेत. त्यामुळे निकालाची दिशा जवळपास निश्चित झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची मतमोजणीही आजच सुरू आहे. भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर झालेल्या या निवडणुकीत त्यांच्या पुत्र अक्षय कर्डिले मैदानात असून त्यांच्या विजयाबाबत समर्थकांकडून विश्वास व्यक्त केला जात आहे. राहुरीत एकूण २७ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून दुपारपर्यंत अंतिम चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघांचे निकाल राज्याच्या आगामी राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.








