Published On : Mon, Apr 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

भांडेवाडीतील दुर्गंधी नियंत्रणात आणण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्या

महापौर श्रीमती निता ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश
Advertisement

नागपूर: भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील दुर्गंधीचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असून, यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने प्राधान्याने कठोर उपाययोजना कराव्या, असे निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी प्रशासनाला दिले.

भांडेवाडीतील डम्पिंग यार्डमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून येणाऱ्या दुर्गंधीचा या परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्यामुळे महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी आज (ता. 6) प्रभाग क्रमांक 23, 24, 25 व 26 मधील नगरसेवक व वरिष्ठ अधिकाऱ्यांची डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समितीच्या सभागृहात बैठक घेतली. यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, नगरसेवक श्री. प्रदीप पोहाणे, नगरसेवक श्री. बालू रारोकर, नगरसेविका श्रीमती रुतिका मसराम, नगरसेविका श्रीमती सरिता कावरे, नगरसेवक अरुण हारोडे, नगरसेविका श्रीमती शीतल रारोकर, नगरसेविका कु. दुर्गेश्वरी कोसेकर, नगरसेवक श्री. राजेश्वर दिवटे, नगरसेविका श्रीमती महेश्वरी बिसेन, नगरसेवक श्री. दीपक वाडीभस्मे, श्रीमती सीमा ढोमणे, श्रीमती शारदा बारई यांच्यासह अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, उपायुक्त श्री. राजेश भगत, कार्यकारी अभियंता श्री. राजेश दुफारे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, स्वयंसेवी संस्थेचे श्री. अविनाश केवटे उपस्थित होते.

या विषयावर बोलताना नगरसेवक श्री. प्रदीप पोहोणे यांनी हा विषय गंभीर असून, महापौर श्रीमती निता ठाकरे व स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी वखरे दाणी यांनी भांडेवाडीचा दौरा केल्यानंतर दुर्गंधीचे प्रमाण बरेच कमी झाल्याचे सांगितले. परंतु, अद्यापही थोडा पाऊस आला तरी नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. नगरसेवक श्री. बाळू रारोकर यांनी दुर्गंधीसाठी कचऱ्यावर करणाऱ्या प्रक्रिया प्लांटमध्ये चिमणीची उंची कमी असल्याचा मुद्या उपस्थित केला.

भांडेवाडी डम्पिंग यार्डला लागून असलेल्या सुरक्षा भिंतीची उंची कमी असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत आहे. यासाठी सुरक्षा भिंतीवर टिनाचा पत्रा लावल्यास नागरिकांना त्रास होणार नाही, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

Advertisement

नगरसेवक श्री. दीपक वाडीभस्मे यांनी परिसरात दुर्गंधी हवेत पसरत असल्याने कुलरच्या द्वारे घराघरात दुर्गंधी घुसत असल्याचे सांगितले. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगितले. कचरा वाहून नेणाऱ्या गाड्या झाकलेल्या राहत नसल्याने दुर्गंध हवेत पसरते व कचरा रस्त्यावर पडत असल्याचेही अनेक नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले.

भांडेवाडी परिरसरातील नगरसेवकांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दुर्गंधी येणार नाही, यासंदर्भात तात्काळ उपाययोजना कराव्या तसेच यासाठी रसायनाच्या फवारणी करण्याची मात्रा वाढविण्यात यावी. कचऱ्यावर प्रक्रिया करणारा सुसबिडी प्रकल्पाचे काम आता पूर्णत्वात आला आहे. भांडेवाडी परिसरातील कचऱ्याचे ढिग ही कमी झाले. भांडेवाडी मध्ये अनेक दिवसापासून साचलेल्या जवळपास अडीच हजार टन कचऱ्यावर प्रतिदिन प्रक्रिया केली जात आहे. त्याचप्रमाणे सूर्यनगरनगरातील सुरक्षा भिंत लहान असल्याने तेथील नागरिकांना त्रास होऊ नये, नागरिकांना तात्काळ दिलासा देण्यासाठी या भिंतीवर टिन लावण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले. कचऱ्याच्या गाड्यांची वाहतूक करताना अनेक वाहने उघडी जात असल्याचे निदर्शनास येत असल्याचे सांगितले. यासंदर्भात कचरा संकलन करणाऱ्या कंपन्यांनी कडक निर्देश देऊन कचर्याच्या वाहने उघडी जाणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश दिले. सध्या भांडेवाडी येथील एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प येथे ८०० टन नवीन कचर्यावर सुद्धा प्रक्रिया प्रतिदिन केली जात आहे. कचर्याच्या दुर्गंधीमुळे सर्वाधिक प्रभावी होणाऱ्या भागाकडे प्राधान्य द्यावे, त्या भागातील कचरा उचलण्याला प्राधान्य असेही महापौरांनी सुचविले.

जलपर्णी साठी नवीन मशीन

अंबाझरीसह शहरातील इतर तलावांमध्ये वाढणाऱ्या जलपर्णीवर नियंत्रण आणण्यासाठी एक्वेटिक वीड हार्वेस्टर मशीन भाडेतत्वावर घेणार असल्याची माहिती महापौरांनी यावेळी दिली. पर्यावरणासाठी घातक ठरणार्या जलपर्णीचे निर्मूलन करण्यासाठी या दोन मशीन घेतल्या जाणार असून यामुळे परिसरातील जलपर्णी काढून टाकण्याचे काम या मशीनद्वारे केली जाणार आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.