नागपूर : अतिरिक्त वर्ग घेण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून मंगळवार, १ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल लोडे असे त्या शिक्षकाचे नाव आहे. हा शिक्षक कोरपना शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असल्याची माहिती आहे. या प्रकरणावर आता स्वतः गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी भाष्य केले. या प्रकरणातील आरोपी
हा काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे. तो फरार झाला होता. मात्र आता त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या वतीने त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.
तर दुसरीकडे पुण्यातील वानवडी येथे व्हॅन चालकाकडून दोन चिमुरड्यांवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आता वानवडी पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली आहे. यावरही फडणवीस यांनी भाष्य केले.
या प्रकरणातील आरोपीला काही स्थानिक राजकीय नेत्यांनी पळून जाण्यात मदत केल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत असे लक्षात आले आहे की, स्थानिक काही नेत्यांनी त्याला पळून जाण्यात मदत केली, अशा प्रकारच्या घटनांमध्ये मी काही राजकीय पक्ष वैगरे बघत नाही. आरोपी हा आरोपीच असतो. अशा आरोपीवर कडक कारवाई केली जाईल. तसेच आरोपीला मदत करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा फडणवीस यांनी दिला.
चंद्रपूर आणि पुण्यातील दोन्ही घटनेत आणखी काही पीडित मुली आहेत का? याचाही तपास केला जात आहे. पुण्यातील घटनेत शाळेच्या व्हॅनमध्ये चालकाने मुलींना चुकीच्या पद्धतीने हात लावला. एका मुलीच्या पालकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर आणखी एका मुलीला त्याने अशाच प्रकारे हात लावल्याचे समोर आले आहे. म्हणून त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थाचालकांनाही याप्रकरणी चौकशीसाठी बोलाविण्यात आले असल्याचे फडणवीस म्हणाले.
दरम्यान या प्रकरणी पुणे पोलिसांनी संजय जेटींग रेड्डी (वय ४५, रा. वैदुवाडी, हडपसर) नावाच्या आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.