
नागपूर: मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर पोलिसांनी प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री व साठा करणाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरात शहरात विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमांमध्ये तब्बल १ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा नायलॉन मांजाचा साठा जप्त करण्यात आला असून, १२८ जणांना अटक करण्यात आली आहे.
नायलॉन मांजामुळे नागरिक, दुचाकीस्वार तसेच पक्ष्यांना गंभीर इजा होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांनी सातत्याने कारवाई सुरू ठेवली आहे. याबाबत माध्यमांमध्ये वारंवार वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिस प्रशासन अधिक सतर्क झाले असून, विशेष पथके तैनात करून तपास मोहीम राबविण्यात येत आहे.
सन २०२४ मध्ये नागपूर शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नायलॉन मांजाची विक्री व साठा करणाऱ्यांविरोधात भा.न्या.सं. कलम २२३ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ मधील कलम ५ व १५ अंतर्गत १२३ गुन्हे दाखल करण्यात आले होते. या कारवाईत १४५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, ५९ लाख ११ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
त्यानंतर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत पोलिसांनी १०२ गुन्हे दाखल करून १२८ आरोपींना अटक केली. या कारवाईत आरोपींकडून १ कोटी ५ लाख ३५ हजार ६४० रुपयांचा नायलॉन मांजाचा साठा व साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच जानेवारी २०२६ महिन्यातच आतापर्यंत ११ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १४ आरोपींकडून ६ लाख ७८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पालकांवरही कारवाईचा इशारा-
नायलॉन मांजाच्या तस्करीप्रकरणी विक्रेते व साठेबाजांवर कारवाई सुरू असतानाच, आता न्यायालयाच्या आदेशानुसार पालकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याअंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या या कठोर कारवाईमुळे यंदा नायलॉन मांजाविरोधात अधिक व्यापक आणि कठोर मोहीम राबविली जाणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. नागरिकांनी नायलॉन मांजाची विक्री व वापर टाळावा, अन्यथा कडक कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.








