Published On : Tue, Jan 23rd, 2018

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात २९ जानेवारीपासून काँग्रेस पक्षाचे राज्यव्यापी आंदोलनः अशोक चव्हाण

Advertisement

Congress
मुंबई: देशात आणि राज्यात दररोज पेट्रोल डिझेलचे दर वाढवले जात आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांची लूट सुरु असून काँग्रेस पक्ष या दरवाढीविरोधात २९, ३०, ३१ जानेवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

आज टिळक भवन दादर येथे काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीसह विविध विषयांवर चर्चा झाली. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे जनतेत तीव्र असंतोष असून जनतेची मोठ्या प्रमाणात लूट सुरु आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून सर्वसामान्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. गेल्या एका वर्षात गॅसच्या किंमती १९ वेळा वाढल्या आहेत. तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती रोज वाढवल्या जात आहेत. आज राज्यात पेट्रोलचा दर प्रती लिटर ८० रुपयांच्या वर गेला आहे तर डिझेल दर प्रती लिटर ७० रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे. राज्यात इंधनावर वॅटसह विविध प्रकारचे सरचार्ज लावले जात आहेत. पेट्रोल डिझेलवर दुष्काळाच्या नावाखाली कर लावून लूट सुरु आहे. सरकारने पेट्रोल डिझेलला जीएसटीत अंतर्भूत करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही म्हणून एका शेतक-याने मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी गोष्ट आहे. सरकार असंवेदनशील आहे. सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर राज्यात १७५३ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत, राज्यातील शेतक-यांचा या सरकारवर विश्वास राहिला नाही.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खा.चव्हाण म्हणाले की, शिवसेनेची विश्वासहर्ता संपली आहे. शिवसेनेच्या घोषणा पोकळ असतात. शिवसेना सत्तेसाठी लाचार असून भाजपने कितीही लाथा घातल्या तरी मुख्यमंत्र्यांशी सौदैबाजी करून शिवसेना पुन्हा भाजपासोबत जाईल.

या बैठकीला राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, आ. नसीम खान, आ. विजय वडेट्टीवार, चंद्रकांत हंडोरे, आ. बस्वराज पाटील, माजी खा. एकनाथ गायकवाड, भालचंद्र मुणगेकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस, प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, अनुसुचीत जाती व विभागाचे प्रदेशाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे पृथ्वीराज साठे उपस्थित होते.