Published On : Thu, Aug 30th, 2018

राज्य परिवहन महामंडळाने ई-बस सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement

मुंबई : जास्तीत जास्त चांगल्या सुविधा दिल्यास राज्यातील प्रवासी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांकडेच (एसटीकडेच) आकर्षित होतील, त्यादृष्टीने बसस्थानकांवर अत्याधुनिक आणि उत्कृष्ट सुविधा देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. एसटीने मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक तसेच तीनशे किलोमीटर अंतराच्या वाहतुकीसाठी ई-बस सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आधुनिकीकरणाच्या विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. बैठकीस परिवहनमंत्री दिवाकर रावते तसेच एसटीचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल तसेच महामंडळाच्या विविध विभागांचे महाव्यवस्थापकीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबई-पुणे, मुंबई- नाशिक तसेच तीनशे किलोमीटर अंतरावरील प्रवासी वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बस सेवा सुरु करण्याबाबत प्रयत्न व्हावेत. विविध महापालिका तसेच एसटी महामंडळाने पुढाकार घेतल्यास, अशा बसेसचे उत्पादन महाराष्ट्रातच करण्याबाबत संबंधित उद्योगांनी तयारी दर्शविली आहे. यामुळे बसेस किफायतशीर किमतीत उपलब्ध होतील.

जुन्या बसचे मालवाहक ट्रकमध्ये रुपांतरण करण्याचा प्रकल्प खर्च आटोक्यात ठेवल्यास या सर्वसंमत पर्यायास चांगला प्रतिसाद मिळू शकतो. बसस्थानकांवर जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यानेच प्रवासी एसटीच्या सेवेकडे आकृष्ट होऊ शकतो. त्यासाठी बसस्थानके अत्याधुनिक आणि उत्कृष्ट सुविधांनी परिपूर्ण करण्याचे प्रयत्न व्हावेत. स्मार्ट कार्डस प्रकल्प नॅशनल मोबिलिटी सर्व्हिस या मुंबईत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक प्रणालीशी जोडण्याचे प्रयत्न करावेत. जेणेकरून राज्यातील प्रवासी अशा कार्डचा वापर कुठेही करू शकेल. त्यासाठी एमएमआरडीए आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्यात यावा.

महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील बसस्थानक आणि बससेवेबाबत विशेष प्रयत्न करण्याची सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

यावेळी परिवहनमंत्री श्री. रावते यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीमुळे महामंडळाला पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नसल्याचे सांगितले. तसेच महामंडळ प्रवासीभिमुखता आणि सुरक्षा यांचे संतुलन साधत अत्याधुनिकतेकडे वाटचाल करत असल्याचे सांगितले.

यावेळी श्री. देओल यांनी एसटी महामंडळाच्या अलीकडील वाटचालीतील महत्त्वपूर्ण बदलांची माहिती दिली. यामध्ये आर्थिक परिस्थितीसह, बसस्थानकांच्या अत्याधुनिकीकरण, बसगाड्यांचे बदलते स्वरुप यांचा समावेश होता. मोरगव्हाण, गणेशपेठ, परभणी, चिपळूण, चंद्रपूर, वर्धा आदी ठिकाणच्या सुविधांबाबत आणि प्रगतीपथावरील कामांबाबतही माहिती देण्यात आली.

बैठकीस महामंडळाच्या विविध विभागांचे महाव्यवस्थापक माधव काळे, राजेंद्र जवंजाळ, आर. आर. पाटील, अशोक कळणीकर, राममनोहर पवणीकर, कामगार अधिकारी प्रताप पवार, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी मनोज लोहिया आदी उपस्थित होते.