Published On : Tue, Aug 27th, 2019

स्टार बसचे ब्रेक फेल : मोठा अपघात टळला

नागपूर : वर्दळीच्या मार्गावर स्टार बसचे ब्रेक फेल झाले. बसचा वेग कमी असल्यामुळे समोरच्या एका कारवर धडकून बस बंद पडली. प्रतापनगर मार्गावर सोमवारी सायंकाळी ६ ते ६. १५ च्या सुमारास हा अपघात घडला.

एमएच ३१/ सीए ६०५० क्रमांकाची स्टार बस सीताबर्डीवरून ईसासनीकडे जात होती. प्रतापनगरात सिग्नलजवळ बसचा वेग कमी असताना बसचे ब्रेक फेल झाले. सुदैवाने यावेळी तेथे वाहनांची वर्दळ कमी होती. समोरच्या कारवर बस धडकून बंद पडली. कारचे मोठे नुकसान झाले मात्र, कुणीही जखमी झाल्याची नोंद नाही. बसमध्ये शाळकरी मुलांसोबत अनेक प्रवासी होते. अपघातामुळे तेथे मोठी गर्दी जमली आणि गोंधळही निर्माण झाला.

या मार्गावरील वाहतूकीत अडथळा निर्माण झाल्याने बाजुच्या चौकातील पोलीस लगेच तेथे पोहचले. प्रतापनगर ठाण्यातही माहिती कळविण्यात आली.

विशेष म्हणजे, सायंकाळी ६ ते ६.१५ च्या सुमारास झालेल्या या अपघाताची प्रतापनगर पोलिसांकडून रात्री ११. ३० वाजेपर्यंत पत्रकारांनाच काय पोलिसांच्या माहिती कक्षालाही माहिती देण्यात आली नाही.