Published On : Wed, Mar 20th, 2019

स्थायी समिती सदस्यांच्या रिक्त जागी आठ सदस्यांची निवड

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या बुधवारी (ता. २०) झालेल्या सर्वसाधारण सभेत आठ सदस्यांची निवड करण्यात आली. राजे रघुजी भोसले नगरभवन (महाल टॉऊन हॉल) येथे महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाच्या सात सदस्यांची नावे गटनेता व सत्ता पक्षनेता संदीप जोशी यांनी बंद लिफाफ्यात महापौरांकडे सोपविली. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे एका सदस्याचे नाव गटनेता व विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे यांनी महापौरांकडे दिले. त्यानंतर महापौरांनी निवडून आलेल्या सदस्यांची नावे जाहीर केली.

निवडून आलेले स्थायी समिती सदस्यांमध्ये लखन येरावार (भाजपा), विजय चुटेले (भाजपा), श्रध्दा पाठक (भाजपा), वैशाली रोहणकर (भाजपा), वर्षा ठाकरे (भाजपा), स्नेहल बिहारे (भाजपा), निरंजना पाटील (भाजपा), जिशान मुमताज मो. इरफान (भा.रा.काँ.) यांचा समावेश आहे.

स्थायी समिती सदस्यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २३ अन्वये भारतीय जनता पक्षाचे सात व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे एक अशा आठ रिक्त जागा भरण्याकरिता या सभेचे आयोजन करण्यात आले होते. म.न.पा.च्या यापूर्वीच्या झालेल्या सभेत नगरसेवक प्रदीप पोहाणे यांच्यासह आठ सदस्यांची यापूर्वीच नेमणूक झालेली आहे.

दरम्यान, होळी सणाचे औचित्य साधून महापौर नंदा जिचकार यांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे आवाहन केले. धुळवडीच्या दिवशी नैसर्गिक रंगाचा उपयोग करावा आणि पाण्याचा वापर टाळून कोरडे रंग खेळण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.