Published On : Tue, Jun 18th, 2019

दिव्यांग बांधवांना मनपा देणार मोक्याच्या ठिकाणी व्यवसायासाठी स्टॉल्स

Advertisement

विधी सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिले प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश

नागपूर: नागपूर शहरातील दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मोक्याच्या ठिकाणी व्यवसायाच्या दृष्टीने स्टॉल देण्यात येतील. यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने तयार करून विधी समितीकडे पाठविण्याचे निर्देश मनपाच्या विधी समितीचे सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी स्थावर विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

Gold Rate
24 May 2025
Gold 24 KT 96,300/-
Gold 22 KT 89,600/-
Silver/Kg 98,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात सोमवारी (ता. १७) आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला समितीच्या सदस्या संगीता गिऱ्हे, जयश्री वाडीभस्मे, अमर बागडे, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, स्थावर अधिकारी सुवर्णा दखने, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य, सहायक विधी अधिकारी प्रकाश बरडे, सूरज पारोचे, आनंद शेंडे, उपस्थित होते.

दिव्यांगांना व्यवसायाच्या दृष्टीने मनपा अर्थसंकल्पात पाच टक्क्यांची तरतूद असून हा निधी त्यांच्यावर खर्च करण्याच्या दृष्टीने त्यांना स्टॉल्स वितरीत करण्यात येणार आहेत. यासाठी मनपाच्या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून अर्ज आमंत्रित करण्यात यावे. समाजकल्याण विभागाकडून अंतिम यादी आल्यानंतर स्थावर विभागाच्या माध्यमातून स्टॉल्स वितरीत करण्यात येतील, अशी माहिती यावेळी सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली.

चिंधी बाजारासाठीही जागा
नागपूर शहरात रेल्वे स्थानकाच्या पूर्व द्वारासमोर, सतरंजीपुरा मनपा झोन कार्यालयासमोर आणि शासकीय तंत्र विद्यालयासमोर चिंधी बाजार भरतो. हा व्यवसाय करणाऱ्या मातंग समाजातील बांधवांसाठी मनपाच्या वतीने एकत्रित जागा शोधून ओटे बांधून देण्याच्या विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली. यासाठी झोन स्तरावर नोडल अधिकारी नेमून अशा लोकांकडून अर्ज आमंत्रित करण्यात यावे. मातंग समाजात काम करणाऱ्या संस्थांची या कामात मदत घ्यावी. स्थावर विभागाच्या माध्यमातून जागा निवडून तेथे ओटे बांधून देण्यात यावे, असे निर्देश सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी यावेळी दिलेत.

चर्मकार समाजासाठीही स्टॉल्स
चर्मकार समाजातील गठई कामगारांना स्टॉल्स देण्याच्या विषयावरही यावेळी बैठकीत चर्चा झाली. यासंदर्भातीलही प्रक्रियाही समाजकल्याणच्या विभागाच्या माध्यमातून दहाही झोन स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करून त्यांच्यामार्फत अर्ज मागविणे आणि विहीत कालवधीत अर्जांची विल्हेवाट लावण्याचे निर्देश स्थावर विभागाला सभापती ॲड. मेश्राम यांनी यावेळी दिले.

विधी सहायकांच्या मानधनात वाढ
नागपूर महानगरपालिकेत विधी विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत विधी सहायकांच्या मानधनात वाढ करण्यासाठी स्थायी समितीकडे सदर प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याचे निर्देशित केले. मानधन वाढवितानाच विधी सहायकांच्या कामाच्या वेळांत वाढ करण्यात येईल, अशी अट यावेळी टाकण्यात येईल. यापुढे विधी सहायकांना एकत्रित मानधन २५ हजार रुपये देण्यात येईल.

Advertisement
Advertisement
Advertisement