Published On : Mon, Aug 15th, 2022

खेळाच्या सुविधांचा फायदा गरिबांनाही मिळावा : ना. गडकरी

Advertisement

‘स्वीमथॉन’ कार्यक्रमाचे उद्घाटन

नागपूर: दररोज 1 लाख मुले, विद्यार्थी मैदानावर खेळले पाहिजे, यासाठी आपले प्रयत्न आहेत. यामुळे नवीन सुदृढ पिढी निर्माण होईल व खेळांप्रती जागरूकता निर्माण होईल. शहरातील मैदानांवर खेळल्या जाणार्‍या खेळांचा फायदा गरिबांनाही मिळाला पाहिजे, यासाठी आपले प्रयत्न आहेत. त्यादृष्टीनेच खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

हनुमान स्पोर्ट्स अ‍ॅकेडमी व जे. डी. स्पोर्ट्स यांच्यातर्फे ‘स्वीमथॉन’ या कार्यक्रमाचे उद्घाटन ना. गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. नासुप्रच्या स्वीमिंग पूल परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला नासुप्रचे सभापती मनोज सूर्यवंशी, डॉ. उगेमुगे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

नासुप्रच्या स्वीमिंगचा पूलचा फायदा साडे चार हजार मुलांना होतो ही आनंदाची बाब आहे. नासुप्रचे खेळाच्या क्षेत्रात मोठे योगदान म्हणजे हा पोहण्याचा तलाव आहे. नागपुरात आपण खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून सर्वच स्तरातील विद्यार्थी, खेळाडूंना विविध खेळ खेळण्याची संधी प्राप्त करून देतो. यामुळे खेळाप्रती जागरूकता निर्माण झाली आहे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात आता खेळाचे मैदाने तयार करण्यात येत आहे. या मैदानावर खेळण्याची संधी त्या त्या भागातील खेळाडूंना मिळेल. तसेच गरिबांनाही येथे खेळण्याची संधी प्राप्त होईल, असेही ते म्हणाले.

खेळाच्या विविध सुविधा शहरातील खेळाडूंना उपलब्ध झाल्या तर खूप फायदा होईल, असे सांगताना ना. गडकरी यांनी सांगितले की, शहरात दिव्यांगांसाठीही एक पार्क तयार करण्यात येत आहे. नासुप्रने जागा दिली आहे. 10-12 कोटींचा निधी केंद्र शासन देत आहे. येथे ब्रेन लिपित लिहिलेले विविध गोष्टी असतील. शहरात होणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमात व खेळांमध्ये गरिबांचाही सहभाग झाला पाहिजे. आता आपण 159 जातींची कमळ पुष्प व 250 जातींचे गुलाबाच्या जाती गोळा केल्या आहेत. जागतिक दर्जाचा एक मोठा बगिचा नागपुरात साकारणार आहे. यामुळे नागपूरच्या वैभवात भर पडेल, असेही ना. गडकरी म्हणाले.