
नागपूर – अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी युवक बिरादरी भारत, के. डी. के. इंजिनिअरिंग कॉलेज आणि अंजुमन इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय ‘अंतरधर्मीय नवरंग स्नेह उडाण कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले. विविध धर्म, पंथ आणि पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना एका व्यासपीठावर आणत परस्पर समज, स्नेह आणि एकात्मतेचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यशाळेदरम्यान अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या शासन योजनांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. महाज्योतीचे लेखाधिकारी प्रशांत वागवे यांनी रोजगार, स्वयंरोजगार, व्यक्तिमत्व विकास आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच महाज्योतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक व प्रशिक्षण कार्यक्रमांविषयीही उपस्थितांना अवगत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक बिरादरीचे चेअरपर्सन निलेश सोनटक्के यांनी केले.
या प्रसंगी मुश्ताक पठाण (बाल संरक्षण अधिकारी व विशेष कार्यकारी अधिकारी, अल्पसंख्यांक आयोग) यांनी त्यांच्या विभागातील लाभदायी योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
सुप्रसिद्ध वक्ते रुषभ राऊत यांनी शासनाच्या विविध विभागांतून सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक, आर्थिक व कौशल्यविकास योजनांचा आढावा घेतला.
कार्यक्रमाची विशेष आकर्षण ठरलेले ‘एक सूर एक ताल’ हे संगीतमय सादरीकरण होते. राष्ट्रीय एकात्मता आणि सद्भावनेचा संदेश देणाऱ्या या प्रस्तुतीचे प्रशिक्षण अतुल सुंदरकर, नृत्यदिग्दर्शक अक्षय जाधव आणि त्यांच्या टीमने दिले.
कार्यक्रमाला सचिन वाकूळकर,के.डी.के. इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही.पी. वरघेसे,CSE विभागप्रमुख डॉ. एस.एम. माळोदे,
अंजुमन इंजिनिअरिंग कॉलेजच्या डीन डॉ. लीना गहाणे,विभागप्रमुख डॉ. तसनीम खान,
स्व. दौलतराव ढवळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र ढवळे,गायक भूषण जाधव,प्राध्यापिका प्रियंका सोनटक्के,संजय खंडार, अंकुश कडू, शर्वरी सोनटक्के यांसह मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश टाले यांनी केले.या उपक्रमामुळे विविध धर्मीय विद्यार्थ्यांमध्ये समन्वय, परस्पर आदर आणि राष्ट्रीय एकात्मतेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे आयोजकांनी सांगितले.









