नागपूर -शालिनीताई मेघे रुग्णालयाच्या परिसरात रविवारी दुपारी भीषण अपघाताची घटना घडली. बांधकाम साहित्य घेऊन आलेल्या अशोक लेलँड ट्रकने रुग्णालय परिसरातून जाणाऱ्या तिघांना मागून जोरदार धडक दिली. या अपघातात २६ वर्षीय श्यामकृष्णन पी. पी. के. यांचा जागीच मृत्यू झाला, तर अमन के. पी. (२३) आणि श्रद्धा विकी वासेकर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांच्या पायांना फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-४० सीटी-३१६१ क्रमांकाचा ट्रक रुग्णालयातील सुरू असलेल्या बांधकामासाठी साहित्य घेऊन आला होता. साहित्य खाली केल्यानंतर चालक ट्रक घेऊन बाहेर पडत असताना रुग्णालयाच्या इमारतीजवळ अचानक ट्रक अनियंत्रित झाला. त्यावेळी तेथून जाणाऱ्या तिघांना ट्रकने मागून धडक दिली.
या धडकेत श्यामकृष्णन ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे रुग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला. अपघातानंतर चालक ट्रक सोडून घटनास्थळावरून फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि ट्रक ताब्यात घेतला. रुग्णालयाचे सुरक्षा पर्यवेक्षक धनंजय गायकवाड यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे.




