Published On : Thu, May 31st, 2018

अग्निशमन आणि विद्युत विभागातील कामांना वेग द्या !

Advertisement


नागपूर: अग्निशमन आणि विद्युत विभागातील अनेक कामे संथगतीने सुरू आहेत. या कामांचा तातडीने पाठपुरावा करून त्याला वेग द्या. भरतीप्रक्रिया कुठलीही असो, त्याची माहिती समिती सदस्यांना यापुढे देण्यात यावी, असे निर्देश अग्निशमन व विद्युत विशेष समितीचे सभापती लहुकुमार बेहते यांनी अधिकाऱ्यांना दिले.

नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात गुरुवारी (ता. ३१) आयोजित अग्निशमन व विद्युत समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला समितीच्या उपसभापती वर्षा ठाकरे, सदस्य ॲड. निशांत गांधी, अनिल गेंडरे, आशा नेहरू उईके, ममता सहारे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त महेश धामेचा, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जयस्वाल, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, सी.जी. धकाते, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उपअभियंता दीपक चिटणीस, सहायक अभियंता ए.एस. मानकर उपस्थित होते.

सदर बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. अग्निशमन विभागामार्फत सन २०१७-१८ या काळात दिलेल्या सूचनापत्र परिपूर्णता प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्र व त्यापासून मनपाला मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत चर्चा करण्यात आली. मनपाच्या उत्पन्नात भर घालण्याकरिता अन्य काय स्त्रोत आहे, याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. सभापती लहुकुमार बेहते यांनी त्रिमूर्तीनगर अग्निशमन स्थानकाच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. कार्यकारी अभियंता नरेश बोरकर यांनी याबाबत आतापर्यंत असलेल्या अडचणी आणि सध्या होत असलेल्या पाठपुराव्याबाबत माहिती दिली. वाठोडा येथील अग्निशमन केंद्राच्ळा बांधकामासाठी सुधारीत नकाशा तयार करण्यात आला आहे. नगररचना विभागाकडे तो मंजुरीकडे पाठविण्यात आला आहे तर लकडगंज येथील प्रस्तावित केंद्राच्या जागा मालकीबाबत स्थावर विभागाला कळविण्यात आले आहे. मोजणी अद्याप व्हायची असून त्याचाही पाठपुरावा सातत्याने सुरु असल्याची माहिती श्री. नरेश बोरकर यांनी दिली.

Gold Rate
Feb 26th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,60,600/-
Gold 22 KT ₹ 1,49,400 /-
Silver/Kg ₹ 2,69,400 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपाच्या अग्निशमन विभागाच्या नवनिर्मित प्रशिक्षण केंद्राच्या इमारत बांधकामास होत असलेल्या विलंबाबाबत सभापती लहुकुमार बेहते यांनी नाराजी व्यक्त केली. प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आल्याने विस्तारीत बांधकामाच्या मंजुरीसाठी प्रकरण प्रलंबित असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

विद्युत विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या सोलर वॉटर हिटर योजनेबाबतची माहिती कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल यांनी दिली. ही योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा ५० टक्के अनुदान केंद्र शासनाकडून येत होते. मात्र, अपेक्षेपेक्षा कमी लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. आता केंद्र शासनाने अनुदान बंद केले असले तरी मनपातर्फे हे अनुदान देत असते. आतापर्यंत या योजनेचा लाभ २७५५ लाभार्थ्यांनी घेतला असून ४०२ अर्जावर लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

नागपूर शहरात एलईडी पथदिवे लावण्याचे काम प्रगतीपथावर आहे. एक लाख ३८ हजारांचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ३२ हजारांवर एलईडी पथदिवे लावण्यात आले असल्याचे श्री. जयस्वाल यांनी सांगितले.

अग्निशमन विभागात वाहनचालकांसाठी जी भरती मोहिम राबविण्यात आली, त्याबद्दल समितीच्या कुठल्याही सदस्यांना माहिती नसल्याबद्दल सभापतींनी नाराजी व्यक्त केली. यापुढे या संपूर्ण प्रक्रियेची प्रत्येक माहिती समिती सदस्यांना देण्याचे निर्देश श्री. बेहेते यांनी दिले. बैठकीला विद्युत विभागाचे अभियंता आणि अग्निशमन विभागाचे स्थानाधिकारी उपस्थित होते.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement