Published On : Sat, Jul 14th, 2018

समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा : महापौर नंदा जिचकार

Advertisement

नागपूर : आपले व्यक्तिमत्व घडत असताना आपले पालक, मित्र मंडळी, नातेवाईक यांचा जेवढा हातभार असतो तेवढाच हातभार समाजाचा देखिल असतो. त्याच समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

नागपूर महानगरपालिका, दृष्टी – स्पर्श आर्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि सक्षम यांच्या सहकार्याने सुप्रसिद्ध चित्रकार चिंतामणी हसबनीस यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचा उद्‌घाटन सोहळा शनिवारी (ता.१४) रोजी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर उत्तर नागपूरचे आमदार डॉ.मिलिंद माने, सक्षमचे विदर्भ प्रांत अध्यक्ष सुधाकर इंगोले, सक्षम नागपूरचे अध्यक्ष उमेश अंधारे, दक्षिण मध्य सांस्कृतिक क्षेत्राचे संचालक दीपक खिरवडकर प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर म्हणाल्या, अतिशय स्त्युत्य असे प्रदर्शन मी माझ्या आयुष्यात प्रथमच अनुभवत आहे. या सर्व चित्रांमधून कलाकाराची प्रतिभा दिसून येत आहे. ही चित्रे दृष्टीहीन मित्रांनाही अनुभवता येत आहे. चित्राला स्पर्श करून दृष्टीहीन मित्रांना ब्रेल लिपीच्या साह्याने ही चित्र ओळखता येतात. याशिवाय डोळसांसाठी चित्रांच्या सौंदर्यात भरही पडते, असेही महापौर नंदा जिचकार यांनी प्रतिपादित केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक चित्रकार चिंतामणी हसबनीस यांनी केले. या चित्र प्रदर्शनामागील पार्श्वभूमी त्यांनी विषद केली. त्यांनी साकारलेल्या एका ब्रेल पेन्टींगचे मान्यवरांच्या हस्ते विधीवत उद्‌घाटन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

या प्रदर्शनात सुप्रसिद्ध नट अभिताभ बच्चन यांची बॅल्क चित्रपटातील भूमिका साकारलेले चित्र, सुप्रसिद्ध नट दिलीप प्रभावळकर यांच्या आवडत्या दहा व्यक्तीरेखा पेंटीगच्या माध्यामातून साकारण्यात आल्या आहेत. याशिवाय रस्ता सहज ओलांडणारी दृष्टीहीन मुलगी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, कोरलेला प्राचीन शिलालेख, निसर्गचित्र, ललितकला मांडणारी चित्रे या प्रदर्शनात मांडलेली आहे.

या प्रदर्शनासाठी नागपूर शहरातील व जिल्ह्यातील सर्व अंध शाळेतील विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या बसेसची सोय करण्यात आली आहे. हे चित्रप्रदर्शन अर्थपूर्ण आणि मनमोकळा संवाद साधणारी पर्वणीच नागपूरकरांसाठी आहे. या प्रदर्शनाला जास्तीत जास्त संख्येने भेट द्यावी, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी आयोजकांच्या वतीने केले आहे.