मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभाग आणि दक्षिण कोरियाच्या एचएस ह्योसंग अँड ॲडव्हान्स्ड मटेरियल्स कॉर्पोरेशन कंपनी यांच्यात १,७४० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबालागन आणि एचएस ह्योसंग अँड ॲडव्हान्स्ड मटेरियल्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष चोंग यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. कंपनीने नागपूरमधील बुटीबोरी येथील प्रगत साहित्य उत्पादन क्षेत्रात ही गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे ४०० स्थानिक लोकांना रोजगार मिळेल.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ह्योसंग कंपनी नागपूरमधील बुटीबोरी येथे एक नवीन अध्याय सुरू करत आहे. कंपनी आता पुणे आणि छत्रपती संभाजीनगरसह नागपूरमध्येही आपले कामकाज वाढवत आहे हे पाहून आनंद होत आहे. या करारामुळे महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक प्रकल्प पुढे येत राहतील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
दरम्यान ह्योसंग ग्रुप ही एक दक्षिण कोरियन कंपनी आहे जी कापड, रसायने, अवजड उद्योग, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक्स अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे.